औरंगाबाद- संधी मिळेल तेव्हा समाज आणि देशाच्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन करत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या दात्यांचे योगदान मोलाचे आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात अमृता यांनी तीन गाणी सादर करीत रसिकांची दाद मिळवली.
एमजीएम आणि शहर पोलिस दलाच्या वतीने बुधवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद््घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अमृता फडणवीस, प्रधान आयकर आयुक्त श्रीवास्तव, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, माजी मंत्री राजेश टोपे, राजेंद्र दर्डा, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, अभिनेता शरद कपूर, अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते झाले. तरुण संगीत दिग्दर्शक आणि गायक मिथुन शर्मा याच्या “तेरे बिन’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अल्तमश फरेदी, ज्योनिता गांधी आणि मोहंमद इरफान यांनी हिंदी चित्रपटातील सुरेल गीते गाऊन रसिकांची मने जिंकली. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या खुमासदार शैलीने रसिकांना अापलेसे केले.
गांधेली, मांटेगाव, गिरसावली, सोनाबाद, धामणगाव, शिवना येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २० कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी या वेळी मदत करण्यात आली. दरम्यान, कॅन्सर झालेल्या दहा मुलांनाही उपचारासाठी मदत केली जाणार असून पोलिस शिपायांच्या गुणवंत पाल्यांनाही उच्च शिक्षणासाठी मदत केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. यशस्वितेसाठी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर, निरीक्षक मधुकर सावंत, अविनाश आघाव, शिवाजी कांबळे, कैलास प्रजापती, ज्ञानेश्वर साबळे, श्रीपाद परोपकारी, मनीष कल्याणकर, लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी परिश्रम घेतले.