आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो, भरकटत न जाता आव्हाने स्वीकारा, सिंधूताई सपकाळ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे. काळानुसार मुलींची वेशभूषा बदलत आहे. खऱ्या अर्थाने शिक्षण घेणे म्हणजे पातळी सोडणे नव्हे तर विद्या विनयेन शोभते असे आहे. त्यासाठी तरुणांनो भरकटत न जाता जीवनातील आव्हाने स्वीकारून पाय मजबूत करा, असा सल्ला सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला.

जी.वाय. पाथ्रीकर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन एमजीएम संस्थेच्या रुख्मिणी सभागृहात मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सिंधुताई म्हणाल्या, आपल्या जवळील माणसे कधीही आपल्यापासून दूर जाऊ शकतात. त्यामुळे कठीण परिस्थितीचा सामना करता येईल असे खांदे मजबूत असायला हवे. संकट कोसळले तर त्यावर पाय ठेवून उभे राहा आणि वेदना पचवायला शिका, त्यामुळे जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना सहज करता येईल. जमली तर प्रीती संपली तर प्रेत असे असल्यामुळे प्रेम करा. ते प्रेम धुतल्या तांदळासारखे असावे. प्रेमाने जग जिंकता आले पाहिजे. त्यांनी आपल्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग सांगितले. मी जसा संकटांचा सामना केला तसा तुम्ही करा असा संदेश त्यांनी दिला. अनुराधा कदम, प्राचार्य प्राप्ती देशमुख, निरुपमा मातोडकर, प्रा. प्रतापराव बोराडे उपस्थिती होती.

देहप्रदर्शन करू नका
मुलींनी फॅशन करावी, परंतु त्यातून देहप्रदर्शन होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपली भारतीय संस्कृती टिकेल अशी वेशभूषा करावी, असा सल्लाही तरुणींना दिला. तसेच मुलांना मोठे करण्यास आई-वडिलांचा मोठे कष्ट करतात . त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज करा, असे मतही सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.