आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड आरोग्याची: चिमुकलीचे अपेंडिक्स पोटातच फुटले; दोन डॉक्टर निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोटातील तीव्र वेदनेसह जुलाब-उलट्यांनी त्रस्त झालेल्या चिमुकलीला घाटीच्या अपघात विभागातून वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल केले. मात्र, सोनोग्राफी करून मुलीला गॅस्ट्रोशिवाय इतर गंभीर आजार नसल्याचे निदान करण्यात आले. वेदनेने तळमळणार्‍या बुशरा शेख हिला तपासण्याची विनंती आई वारंवार विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांना करत होती; पण त्यांनी एकदाही तपासले नाही. दुसर्‍या दिवशी मुलगी अत्यवस्थ झाली. दुसर्‍यांदा सोनोग्राफी केली आणि अपेंडिक्स पोटातच फुटल्याचे माहीत झाले.

प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निवासी डॉक्टर डॉ. निकिता काबरा व डॉ. सुमीत अजमेरा यांना निलंबित करण्यात आले. आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया झाली आणि केवळ सुदैव म्हणून मुलगी बचावली.

बुशरा 10-12 वर्षांच्या मुलीला पोटात तीव्र वेदनेसह जुलाब-उलट्यांचा त्रास वाढल्यामुळे रविवारी (21 जुलै) घाटीच्या अपघात विभागात दाखल केले. लक्षणांवरून निवासी डॉक्टरने पोटाची अवघ्या काही मिनिटांत सोनोग्राफी केली आणि गॅस्ट्रोशिवाय इतर काहीही आजार नसल्याचे निदानही करून टाकले. तसा रिपोर्ट रविवारी देण्यात आला आणि बुशरा हिला वॉर्ड क्रमांक 25 मध्ये दाखल करण्यात आले. दुसर्‍या दिवशी बुशराची प्रकृती गंभीर झाली. उलट्या-जुलाबांसह पोट फुगले. वेदनेने तळमळणार्‍या चिमुकलीचे हाल आईला पाहवले नाहीत. त्यामुळे राउंडच्या वेळी आलेले बालरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी निदान लक्षणांमुळे तरी मुलीला तपासावे, अशी आईने विनंती केली; परंतु डॉ. पाटील यांनी एकदाही तपासले नाही. तसेच त्यांच्या विभागातील निवासी तसेच इतर डॉक्टरांनीही खरी परिस्थिती ओळखली नाही आणि विभागप्रमुखांना सांगितली नाही. शेवटी मुलीची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिचे वडील शेख मिकईल शेख बशीर यांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली. बुशराची दुसर्‍यांदा सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा मात्र पोटामध्येच अपेंडिक्स फुटल्याचे स्पष्ट झाले आणि तसे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर जागे झाले आणि तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर, विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक यांच्या दुर्लक्षामुळेच मुलीवर ही जीवघेणी वेळ आली, अशी तक्रार बुशराच्या वडीलांनी केली.

चुकीचे निदान आणि चुकीचे उपचारही झाले. आदल्या सोनोग्राफीत अपेंडिक्स वाढलेले दिसत नाही आणि दुसर्‍या दिवशी अपेंडिक्स फुटलेले दिसते, हे असे कसे असू शकते, असा सवालही वडील शेख यांनी उपस्थित केला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा झालेली चूक डॉक्टरांच्या लक्षात आली, तेव्हा केसपेपरवर खाडाखोड करण्याचाही प्रयत्न झाल्याची तक्रार त्यांनी केली.


राजकीय संघटना आक्रमक
निष्काळजीपणाविरुद्ध ‘यूथ रिपब्लिकन’, ‘रिपब्लिकन सेना’ तसेच ‘यूथ काँग्रेस’ आदी संघटना सरसावल्या आहेत. ‘यूथ रिपब्लिकन’चे मराठवाडा सचिव रोहित थोरात, ‘रिपब्लिकन सेने’चे के. व्ही. मोरे, दिनकर ओंकार, विशाल निकाळजे, आझम जहागीरदार, तसेच ‘यूथ काँग्रेस’चे गुरुमितसिंग गिल यांनी अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांच्याकडे तक्रार केली. तसेच विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, निवासी डॉक्टर डॉ. निकिता काबरा व डॉ. सुमित अजमेरा यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

विभागप्रमुखांचे काय होणार?
मुख्य जबाबदारी असणार्‍या डॉ. पाटील यांच्यावर काय कारवाई होणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला. विविध संघटनांनी तसेच बुशराचे वडील शेख मिकईल शेख बशीर यांनीही विभागप्रमुख निलंबित झालेच पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केल्यास ‘मार्ड’ संघटना संपावर जाते, काम बंद आंदोलन केले जाते, मात्र आता जेव्हा डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला आहे, तेव्हा ‘मार्ड’ काही आंदोलन करणार का, असा सवालही शेख यांनी केला आहे.