आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयएमचा अपवाद; स्वीकृत नगरसेवक पक्के राजकारणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पालिकेत तज्ज्ञ असावेत म्हणून स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेत शासनाने बदल केला. वेगवेगळ्या क्षेत्रांतील मंडळी पालिका सभागृहात येतील, असे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात पक्के राजकारणीच मागील दाराने स्वीकृत या नावाने पालिकेत प्रवेश करणार असल्याचे दिसते. पाच स्वीकृत सदस्य कोण असतील, याचा शोध ‘दिव्य मराठी’ने घेतला असता राजकारणातील तज्ज्ञच नगरसेवक होणार असल्याचे समोर आले. याचा नव्याने दाखल झालेला एमआयएम हा पक्ष अपवाद ठरला आहे. त्यांनी निवृत्त न्यायाधीशाला ही संधी दिली आहे.
राजकीय पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनांचेही पदाधिकारी असल्याची कागदपत्रे सादर करून नगरसेवक होण्याच्या मागे लागले होते. त्यातील चार जणांना ही संधी मिळणार आहे. शिवसेनेकडून महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चेतन कांबळे, भाजपकडून माजी नगरसेवक समीर राजूरकर संघटनेचे पदाधिकारी विकास कुलकर्णी, तर १४ जणांच्या अपक्षांच्या गटातून माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे चिरंजीव बंटी ऊर्फ गोपाल तनवाणी यांनी संधी मिळणार असल्याचे समजते.
यांच्यातूनच असतील संभाव्य स्वीकृत नगरसेवक (कंसात कोटा)
- भाजप: समीर राजूरकर किंवा विकास कुलकर्णी (१)
- शिवसेना: सुनीता आऊलवार, बाळासाहेब थोरात, चेतन कांबळे. (२)
- एमआयएम: न्या. (निवृत्त) ए. टी. सय्यद (१)
- अपक्ष गट: बंटी ऊर्फ गोपाल तनवाणी (१)
वरील नावे निश्चित झाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे. पालिका आयुक्तांनी केलेल्या छाननीत वरील सर्वांचे अर्ज वैध ठरले आहेत. येत्या शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
कागदपत्रांची बनवाबनवी? : स्वीकृतसदस्यांच्या नव्या निकषात बसता यावे यासाठी इच्छुकांनी विविध क्षेत्रांतील अनुभवी असल्याचे दाखवण्यासाठी कागदपत्रांची बनवाबनवी करण्यात आल्याची चर्चा आहे. छाननीच्या वेळी याला काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. स्वीकृत म्हणून घोषणा झाल्यानंतरही पुन्हा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
एमआयएमने पाळले निकष : विधी,अभियांत्रिकी, निवृत्त अधिकारी यांच्यातून स्वीकृत सदस्य पाठवण्यात यावा, असे शासनाला अपेक्षित आहे. हा निकष एमआयएम या पक्षाने खऱ्या अर्थाने पाळला आहे. त्यांनी निवृत्त न्यायाधीशाला पालिकेत काम करण्याची संधी दिली आहे. या पक्षाने गेल्याच आठवड्यात त्यांच्या स्वीकृत नगरसेवकाच्या नावाची घोषणा केली. शनिवारी त्याची औपचारिकता पूर्ण होईल.
बातम्या आणखी आहेत...