आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचे फेसबुक भारतातून, औरंगाबादसारख्या छोट्या शहरातून येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतातील आयटी अभियंते या क्षेत्रावर आपल्या ज्ञानाच्या जोरावर राज्य गाजवत असून आगामी फेसबुक किंवा गुगल अमेरिकेतून नव्हे तर भारतातून आणि तेही औरंगाबादसारख्या छोट्या शहरातून येईल, असा विश्वास सीआयआयचे अध्यक्ष आणि अँप्टेकचे व्यवस्थापकीय संचालक निनाद करपे यांनी व्यक्त केला.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी निनाद करपे यांचे ‘आयटी क्षेत्रात अभियंत्यांना करिअरच्या संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. करपे म्हणाले की, कल्पनाशक्ती, नावीन्याचा ध्यास, काम करण्याची झिंग असेल तर आयटीच्या क्षेत्रात जग पायाशी येऊ शकते. त्यासाठी सातत्याने नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. भारतात आयटी क्षेत्रात औरंगाबादसारख्या छोट्या शहरातील अभियंते मोठी कामगिरी करू शकतात. आगामी काळात इंटरनेटच्या जगात येणारे नवे फेसबुक किंवा गुगलसारखे काही तरी क्रांतिकारी अमेरिकेतून येणार नाही. ते भारतातून येईल, तेदेखील अशा औरंगाबादसारख्या छोट्या शहरातून असा मला ठाम विश्वास आहे.

आयटीमध्ये करिअर करण्यासाठी आयटी सेवा, सॉफ्टवेअर निर्मिती, बीपीओ, अभियांत्रिकी आणि संशोधन-विकास, हार्डवेअर, पायाभूत सुविधा ही क्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यात पुन्हा वेब डेव्हलपर, हॅकर, सिस्टिम अँडमिनीस्ट्रेटर, 3 डी आर्टिस्ट, आयटी सल्लागार, प्रोग्रामर ही उपलब्ध संधी आहे. आपली रुची आणि गती पाहून आयटी अभियंत्यांना करिअर करता येऊ शकते, असे करपे म्हणाले.

मोबाइल आणि अँप्स
मोबाइल तंत्रज्ञानाबाबत करपे म्हणाले की, आज भारतात 80 कोटी मोबाइलधारक आहेत. जगात स्मार्टफोनधारकांची संख्या दीड अब्ज आहे, तर मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या 17 टक्के आहे. येत्या दोन वर्षांत हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. सध्या मोबाइलवरील इंटरनेट फक्त मनोरंजनासाठी वापरले जात असले तरी लवकरच त्याचा वापर बदलेल. बँकिंग, आरोग्य, शिक्षण यासह सारे काही मोबाइल तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आहे. या मोबाइलसाठी लागणारे अँप्स हे सर्वात मोठे क्षेत्र राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही. तुम्ही येथे बसून ते अँप्स तयार करू शकता. जगातील सगळ्या क्षेत्रांत मोबाइलचा वापर अत्यावश्यक होणारच आहे. शिवाय ओपन टेक्नॉलॉजी ही आगामी काळातील कळीची बाब बनणार आहे. इंटरनेटमुळे जगाची सीमा पुसली गेली असल्याने कशावरच कुणाची मालकी राहणार नाही. व्हिडिओ ही आगामी काळाची भाषा असणार आहे, तर माहिती मोफत असणार आहे. आयटी अभियंत्यांनी या तीन बाबींवर लक्ष केंद्रित करून करिअर करायला हवे. या वेळी एमजीएमचे प्रदीपकुमार, सीआयआयचे ऋषी बागला, प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.

सोशल मीडिया तर सुरुवात
ऑकरुट आले आणि संपले, आता फेसबुक, ट्विटरचा गवगवा होत असताना सोशल मीडियाचे भवितव्य काय या प्रश्नावर निनाद करपे म्हणाले की, सोशल मीडियाच्या बाबतीत कधी काय क्लिक होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियाची ही सुरुवात आहे. 5 टक्केसुद्धा काम त्यात झालेले नाही. त्यामुळे येथे नवीन कल्पनांनाच स्थान मिळणार आहे.

क्लाऊडसाठी तयार राहा
आयटी हे आता विश्वव्यापक आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अत्यावश्यक अंग बनले आहे. त्यामुळे आगामी काळात क्लाऊड, मोबाइल आणि ओपन टेक्नॉलॉजी या तीन बाबी कळीच्या ठरणार आहेत. त्यात काम करण्यासाठी आकाश पूर्ण मोकळे आहे हे सांगत करपे म्हणाले की, क्लाऊड प्लॅटफॉर्मचा परिणाम खूप मोठा असणार आहे. कधीही, कुठेही, केव्हाही तुमच्या सोयीनुसार तंत्रज्ञान हाताशी असणार आहे. तुम्ही याबाबतीत तयार नसाल तर कालबाहय़ व्हाल.