आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यातील 14 कोटी जनतेच्या सुरक्षेकडे कानाडोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दहशतवादाच्या टार्गेटवर असणा-या औरंगाबादसह मराठवाड्यातील शस्त्रागार शाखा सध्या वा-यावर आहे. 3 हजार 600 पोलिस कर्मचा-यांचा थेट संबंध असलेला हा विभाग सध्या हवालदाराच्या भरवशावर सुरू आहे. शस्त्रांची शास्त्रशुद्ध तपासणी करणारे आणि काळजी घेणारे प्रशिक्षित आर्मोरर (आयुधिक) हे पद गेल्या 16 वर्षांपासून भरलेले नाही. विशेष म्हणजे पोलिस महासंचालक संजीव दयाळ हेदेखील याकडे कानाडोळा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई येथील पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन 3 जून रोजी दोन प्रशिक्षित हवालदारांना जागा रिक्त होताच पदोन्नतीवर आर्मोरर शाखेच्या उपनिरीक्षकपदी नियुक्ती दिली आहे.
मात्र औरंगाबादसह राज्यातील इतर आर्मोरर शाखेकडे खुद्द पोलिस महासंचालकच दुर्लक्ष करीत आहेत. औरंगाबादबरोबरच मुंबई वगळता राज्यातील कुठल्याच जिल्ह्यात आयुधिकाची जागा गेल्या 16 वर्षांपासून भरण्यात आलेली नाही. पोलिस नियमावली 1999 नुसार पोलिस आयुक्तांना हे पद भरण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र त्यावर गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. यासंदर्भात निवृत्त सहायक फौजदार पांडुरंग गायकवाड यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्यातील पोलिस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयाअंतर्गत एक हजार 842 पदे रिक्त आहेत. त्यापैकी केवळ 577 पदे भरण्यात आली आहेत. जुनाट शस्त्रांमुळे अनेक अपघातांना पोलिसांना सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत.

18 नोव्हेंबर 1998 : पडेगाव फायरिंग बटावर गोळीबाराचा सराव सुरू असताना रायफलचा स्फोट झाल्याने आर्मोरर शाखेतील मुरलीधर उत्तमराव आढाव यांच्या पायात लोखंडी तुकडा शिरला होता. यामुळे त्यांचा पाय निकामी झाला होता. सध्यादेखील ते आर्मोरर शाखेत कार्यरत आहेत.

29 नोव्हेंबर 1998 : पडेगाव फायरिंग बटावर गोळीबाराचा सराव सुरू असताना 303 बंदुकीचा स्फोट होऊन भरत सखाराम कोकणे आणि शेख अहमद हे जखमी झाले होते.

17 सप्टेंबर 2000 : लातुरात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शहिदांना मानवंदना देण्याचा आदेश झाला. या वेळी तत्कालीन पालकमंत्री आनंदराव देवकाते आणि तत्कालीन अधीक्षक आशुतोष डुंबरे उपस्थित होते. मानवंदना देताना वापरात असलेल्या रायफलमधून गोळीच झाडली गेली नव्हती.

26 नोव्हेंबर 2008 : च्या अतिरेकी हल्ल्यावेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांचा पाठलाग करताना कालबाह्य झालेल्या रायफलमधून गोळ्याच सुटल्या नव्हत्या.
28 नोव्हेंबर 2011 : जालना येथील प्रशिक्षणार्थी पोलिस गोळीबाराचा सराव करत असताना 30 एसएलआर रायफल निकामी झाल्या होत्या.

काय म्हणते नियमावली ?
शासनाच्या 1999 च्या पोलिस नियमावलीतील भाग-1 मधील 58-अ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपद आयुक्तालयामध्ये निवड यादीमध्ये असलेल्या पोलिस हवालदार (आर्मोरर) यांच्यामधून पोलिस आयुक्त भरतील. शस्त्र तपासणी शाखेतील जिल्हा संवर्गावरील उपनिरीक्षक हे पद बढतीकरिता योग्य असलेल्या निवड यादीवरील जिल्ह्यांमधील प्रशिक्षित आर्मोरर यांच्यामधून भरले जाईल. या पदासाठी लायक आर्मोरर पोलिस हवालदारांच्या निवड याद्या पोलिस आयुक्त, उपायुक्त (मुख्यालय) आणि उपायुक्त शस्त्र तपासणी शाखा हे निवड समितीचे सदस्य राहतील.
अशी होतात शस्त्रे प्रमाणित
जुनाट शस्त्रे वापरायची असल्यास ती अधिकृत वरिष्ठ तज्ज्ञ अधिकारी (इलेक्ट्रिक मेकॅनिक असिस्टंट इंजिनिअर ऑफ स्मॉल आर्म्स) यांना प्रमाणित करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रशिक्षण घेतलेले कर्मचारीच राज्यातील आर्मोरर शाखेत नियुक्त आहेत. मात्र तरीदेखील मुंबई वगळता इतरत्र कोठेही ही पदे भरण्यात आलेली नाहीत. यामुळे शाखेतील कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.