आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावे महापौर झाले, टाचणीने आघाडीचा फुगा फोडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८९-९० मध्ये शिवसेनेने औरंगाबाद महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भगवाच फडकला पाहिजे असे ठरवले. त्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, सुधीर जोशी इत्यादींनी औरंगाबादला भेट देऊन सर्व नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. सर्वानुमते सावे साहेबांना शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अपक्ष उमेदवार सावे साहेब शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले. काँग्रेसच्या ३२ उमेदवारांची एकजूट भेदून सावे साहेब निवडून येणे गरजेचे होते. शिवसेनेची सत्तावीस मते त्यांच्याकडे होती. तरीही शिवसेनेतील सुप्त नाराजीचा धोका होताच. पीठासीन अधिकारी डॉ. शांताराम काळे (महापौर) हे असणार होते. दोन उमेदवारांना समसमान मते पडली तर निर्णायक देण्याचा अधिकार पीठासीन अधिकारी डॉ. काळे यांना होता. १८ मे १९८९ रोजी सकाळी ११ वाजता मतदान जाहीर झाले. काँग्रेसतर्फे नरेंद्र पाटील आणि शिवसेनेतर्फे सावे साहेब हे दोन उमेदवार महापौरपदासाठी आमने-सामने उभे होते.
निवडणुकीच्या वेळेनंतर थोड्याच अवधीत आमच्या कानावर फटाक्यांचा आवाज आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघेाष ऐकू आला. लगेचच सावेंचा फोन आला आणि त्यांनी सांगतलं की, प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभाग क्रमांकानुसार मतदान करण्यासाठी बोलावले जात होते. डॉ. काळे यांनी त्यांचे मत मतदान पेटीत टाकण्याअगोदर महापालिका आयुक्त गौतम पळत त्यांच्याकडे गेले आणि ते पीठासीन अधिकारी आहेत, त्यांना मतदान करता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. शिकले सवरलेले काळे पालिका आयुक्तांची आज्ञा प्रमाण मानून परत आपल्या जागी जाऊन बसले. हे उघड होते की, ५९ नगरसेवकांनीच मतदानात भाग घेतला होता. यानंतर नरेंद्र पाटील सावेंच्या मतांची छाननी मोजणी करण्यात आली. सावेंना ३०, तर नरेंद्र पाटील यांना २९ मते पडली. परंतु या ठिकाणी एका मताने निवडून आले, असे घोषित केले नाही. मग सुभेदारी विश्रामगृहावर उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकच गलका केला. महापौरांना त्यांचे मत टाकण्यास भाग पाडले. निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी ती मतपत्रिका डॉ. काळे यांच्याकडे आणून दिली आणि काळे यांनी त्या पत्रिकेवर स्वत:जवळील पेनने खूण केली मतपत्रिका नरेंद्र पाटील यांच्या मतपत्रिकेत मिसळून टाकली. जर काळे यांनी आपले निर्णायक मत त्या वेळी टाकले असते तर नरेंद्र पाटीलच महापौर झाले असते. सावेंनी त्यांची भीती दूरध्वनीद्वारे आम्हाला कळवली. खडकेश्वर येथील ऑफिसमधून आम्ही सावेंना सूचना केली की, संपूर्ण मतदान प्रक्रिया रद्द करून नव्याने ८-१० दिवसांनंतर निवडणूक घेण्यात यावी, असा ठराव साहेबांनी मांडावा.
योगायोगाने त्यांनी तसा ठराव मांडला. तो मंजूर होऊन सभा संपली. सर्वांचे लक्ष भविष्यात होणाऱ्या सभेकडे लागले. इकडे माझ्यात शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झाली दोन-तीन दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरले. प्रश्न असा होता की, याचिका कोणी दाखल करायची? कारण निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्याचा ठराव सावेंनीच मांडला होता. सर्व नगरसेवकांनीही त्याला मान्यता दिली होती. त्यामुळे त्यांना याचिका दाखल करता येईल काय? जवळजवळ सर्वांचेच असे मत होते की, उच्च न्यायालय याचिका दाखल करून घेणार नाही. माझे मत मात्र वेगळे होते. मनोहर जोशी यांना मी माझ्या मताच्या योग्यतेची खात्री करून दिली.
याचिकेची सुनावणी १९ जून १९८९ रोजी न्या. बी. एन. देशमुख न्या. आय. जी. शहा यांच्या खंडपीठासमोर होती.जी घटना औरंगाबादला नव्हे, तर संपूर्ण राज्याला माहिती होती, ती न्यायालयात फिरवणं फार सोपं होतं. काँग्रेस आघाडीचे ३२ नगरसेवक, आयुक्त, सर्व शासकीय अधिकारी यांनी दबावाला बळी पडून न्यायालयात शपथपत्राद्वारे उलटे काही सांगितले असते तर आम्हाला काहीच संधी मिळणार नव्हती. त्यामुळे सावेंपेक्षा मीच जास्त चिंतातुर झालो होतो. त्याच क्षणी माझ्या डोक्यात वीज चमकली. आम्ही त्या काळातील स्टिंग केले. सहा अधिकाऱ्यांचे बोलणे रेकॉर्ड केले. त्यांना काहीही कळू देता. त्यांच्या बोलण्यातून बऱ्याच गंभीर बाबी स्पष्ट झाल्या. त्या कॅसेट्स आम्ही न्यायालयात सादर केल्या. डॉ. काळेंनी आपल्या क्रमांकावर मतदान टाचणीने जोडून ठेवली होती. मतमोजणी झाल्यावर जेव्हा सावे साहेबांना तीस मते पडली त्याच वेळी डॉ. काळे यांना मत देण्यास भाग पाडले आणि त्यांनी टाचणीने जोडलेली मतपत्रिकाच घेऊन स्वत:च्या पेननेच त्यावर घाईघाईत फुली मारली.मतदानाची वेळ संपल्यावर टाकलेली ही मतपत्रिका उच्च न्यायालयाने अवैध ठरवली. देशातील सर्व माध्यमांनी या खटल्याची दखल घेतली. त्या वेळच्या मराठवाडा दैनिकाने अग्रलेख छापला, ज्याचे शीर्षक होते - ‘टाचणीने आघाडीचा फुगा फोडला.’
अंजली चित्रपटगृहाचे भूमिपूजन माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.
बातम्या आणखी आहेत...