आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड : पहाडे चाळ बॉम्बचे प्रात्यक्षिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अग्रणी, औरंगाबादचे पहिले आमदार (१९५२) माणिकचंदजी पहाडे यांच्याविषयी त्यांचे चिरंजीव प्रा. अनिल पहाडे यांनी लिहिलेल्या ‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील माणिक’ या पुस्तकातील एक अंश "दिव्य मराठी'च्या वाचकांसाठी...
माणिकचंद पहाडे यांना गिरिजाशंकर आपले दैवत मानत होता. त्यांनी सोपवलेली कामगिरी पार पाडणे तो आपले आद्य कर्तव्य समजत असे. त्याने अवघ्या दहा दिवसांत दोन हजार देशी हातबॉम्बमध्ये स्फोटके भरली. गिरिजाशंकर भावसार ऊर्फ हिंदुस्थानने आपल्या जिवाचे रान करून देशी हातबॉम्बच्या

शेलमध्ये स्फोटक रसायने भरण्याला वेग दिला. तेव्हा हातबॉम्बचा स्फोट झाल्यावर त्याचा आवाज किती मोठा होतो व त्याचा काय परिणाम होतो, याचे प्रात्याक्षिक जातीने पाहायचे, असे त्याने कुणालाही न विचारता ठरवले. एकेदिवशी रात्री दहा वाजता नदीच्या काठाजवळ असलेल्या एका जुनाट व मोठ्या बाभळीच्या झाडाच्या बुंध्याजवळ त्याने एका भरलेल्या शेलची फ्यूज वायर पेटवली. तेथून जेमतेम तो घराच्या दारापर्यंत आला असेल तेवढ्यात जवळपासच्या लोकांना कानठळ्या बसतील, असा आवाज आला. त्या आवाजाने लोक सैरावैरा पळाले आणि सापडेल त्या आडोशाजवळ दडून बसले. दुसऱ्या दिवशी त्या भयंकर आवाजाबाबत मनमाड गावात बरीच चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या निमित्ताने गिरिजाशंकर त्या बाभळीच्या झाडालगतच्या नदीच्या किनाऱ्याकडे गेला. तेव्हा ते बाभळीच्या झाडाचे खोड नदीच्या किनाऱ्यावर आडवे पडलेले त्याला पाहायला मिळाले. त्याचे बाहू स्फुरण पावले. आनंदाने तो हसू, नाचू लागला. शेलचा धुमधडाका लवकरात लवकर माणिकचंद पहाडे यांना एकांतात गाठून सांगताच पहाडे यांचा ऊर दाटून आला. क्षणांत त्यांचा चेहरा रक्तासारखा लालजर्द झाल्यासारखा दिसू लागला. गिरिजाशंकरला आतल्या खोलीत बोलावून त्याची पाठ थोपटताना त्याला त्यांनी कडाडून मिठी मारली.

रात्री दहा वाजेपर्यंत पहाडे यांनी प्रतिहल्ले करण्यासाठी तयारी केली. हातबॉम्ब विश्वासू कार्यकर्त्यांद्वारे शेंदुर्णी, देऊळगावराजा, अंबडचे साडेगाव, बोधेगाव टाकळी, टोका, अंगुलगाव, औरंगाबाद, जालना, वैजापूर, कन्नडला पाठवले. ठिकठिकाणच्या तडफदार कार्यकर्त्यांनी त्या शेलद्वारे जोरदार प्रतिहल्ले चढवले. शेलच्या स्फोटांनी अनेक गावांतील जमीन हादरली. धांगडधिंगा घालणारे गावगुंड, रझाकार, पोलिसांची पळ काढताना त्रेधातिरपीट उडाली. मस्तीने बेभान बनलेले गर्भगळित झाले.