आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाष्य: खड्ड्यांचे शहर ही आत्मवंचनाच (दीपक पटवे )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘खड्ड्यांचे शहर’ असेनामाभिधान आपल्याच शहराला लावताना आम्हाला अतीव दु:ख होते आहे; पण या शहरातील जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी असे करणे आम्हाला भाग पडले आहे. शहराचे असले नामकरण होऊ नये यासाठी ठोस पावले उचलली जाणे ज्यांच्याकडून अपेक्षित होते त्यांच्याकडून ती उचलली जात नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या, म्हणजेच या शहराच्या हाती केवळ आत्मवंचनाच उरली आहे. ‘खड्ड्यांचे शहर’ असे नामकरण ही या शहराने करून घेतलेली आत्मवंचना आहे. त्यामुळे तरी सक्षम व्यक्ती आणि यंत्रणा भानावर यावी, अशी अपेक्षा आहे.

उद्या, म्हणजे सोमवारी घराघरांत गणेशाचे आगमन होते आहे. गणेशाच्या मूर्ती घरोघर नेताना, सार्वजनिक मंडळांसाठीच्या मूर्ती मंडपांपर्यंत नेताना सुखरूप जाव्यात यासाठी तरी या उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची समयसूचकता आतापर्यंत दाखवली जात होती. यंदा तर तीही दिसत नाही. लोकांनी ओरड केली, ‘दिव्य मराठी’ने लोकांना आवाहन केले, त्यानुसार जागोजागी अनेक स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती खड्डे बुजवण्यासाठी पुढे आल्या. हे सारे उपरोधिक होते. त्यामुळे तरी महापालिकेला लाज वाटेल आणि खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल असे वाटले होते; पण तसे काही घडले नाही. एवढेच नाही, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश दिले आणि मुदत ठरवून दिली तरी महापालिकेच्या कर्त्याधर्त्यांना फरक पडला नाही. लोक खड्डे बुजवताहेत याची लाज वाटते, असे म्हणून शांत बसण्याऐवजी महापौर हातात मुरुमाची तगारी घेऊन रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी उतरले असते तर त्यांना खरोखरच औरंगाबादकरांची काळजी आहे, असे वाटले तरी असते. पण तसेही काही घडले नाही. म्हणून हे शहरच औरंगाबाद असे म्हणवून घेण्याऐवजी ‘खड्ड्यांचे शहर’ असे म्हणवून घेत आत्मवंचना करीत आहे, असे आम्हाला वाटते. तेच आजच्या अंकातून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केला आहे.
बातम्या आणखी आहेत...