आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळे-वेगळे: खबरदार लेक्चर बुडवाल तर..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेज लाइफ एन्जॉय करावे; पण ते करतानाच विद्यार्थिदशेचे भान ठेवून अभ्यासही करावा, गुरुजनांचा मान ठेवला जावा आणि गुरुजनांनीही ज्ञानार्जन करताना आपले कसब पणाला लावावे.. हा उद्देश ठेवून शहरातील एमजीएम या शिक्षण संस्थेने सीएएस (सॉफ्टवेअर) या संगणक प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी पिरियडला हजर राहतात की नाही, दिलेला अभ्यास व असाइनमेंट पूर्ण करतात की नाही, हे घरबसल्या त्यांच्या पालकांना कळू शकणार आहे. एवढेच नव्हे, तर एमजीएमच्या व्यवस्थापनाला विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यास मदत होणार आहे. शिवाय गुणात्मक दर्जाही उंचावला जाणार आहे.

महाविद्यालयात एकदा प्रवेश घेतला की मुलांना कॉलेजची ‘हवा’ लागते, असे म्हटले जाते. कट्टय़ावर बसणे, उनाडक्या करणे, वर्गात गैरहजर राहणे आणि महाविद्यालयीन जीवन म्हणजे केवळ मौजमजा करणे हा भलताच समज काही जण करून घेतात. यावर उपाय म्हणूनच महात्मा गांधी मिशन अर्थात एमजीएम या संस्थेने सीएएस प्रणाली आणली आहे.

काय आहे सीएएस प्रणाली?
सीएएस म्हणजे ‘कॉलेज अँडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टिम’ होय. प्राध्यापक, विद्यार्थ्याच्या रोजच्या हजेरीपासून ते तब्बल 10 वर्षांच्या परीक्षेचा निकाल या प्रणालीवर उपलब्ध असणार आहे. प्राध्यापक मंडळी रोज घेत असलेल्या हजेरीसह रोजच्या असाइनमेंट या प्रणालीमध्ये अपलोड करतील. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या प्रणालीमध्ये बायोमेट्रिक यंत्रणाही जोडलेली आहे. त्यातून प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या वेळा निश्चित कळून येतील. त्यांच्या चांगल्या कामाचेही मूल्यमापन यातून होऊ शकेल. देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात आणि कोणत्याही भागात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक मंडळी लॉग इन करून महाविद्यालयातील घटनाक्रमाची माहिती मिळवू शकतील. एजीएमच्या जेएनईसी, जी. वाय. पाथ्रीकर इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आदी विभागांत ही प्रणाली बसवण्यात आली आहे. याचे लॉग इन एमजीएम व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आले आहे. यामुळे प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील दिनक्रमाची माहिती अपलोड करावी लागणार आहे.

कारभारात पारदर्शकता
प्रवेश अर्जासहित असाइनमेंट, पेंडिंग वर्क, लेक्चर, तसेच प्रोजेक्ट तयार करण्यासाठी लिंक, विद्यार्थ्याची वर्गातील प्रगती, टाइमटेबल या सॉफ्टवेअरमुळे ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. वर्गात प्राध्यापक जर शिकवत नसतील व विद्यार्थ्यांना त्यांचे शिकवणे समजत नसेल तर विद्यार्थी त्याबाबतही आपले मत या प्रणालीद्वारे नोंदवू शकतात. या प्रणालीमुळे गैरहजर विद्यार्थ्यांना त्यांच्या गैरहजेरीचे कारण पालकांसह प्राचार्यांना द्यावे लागणार आहे. जेणेकरून लेक्चर बुडवणार्‍या विद्यार्थ्यांना आळा बसू शकेल. शिवाय सगळा कारभार पारदर्शक होऊ शकेल. यातूनच गुणात्मक दर्जाही उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच संस्थेचे 5,503 विद्यार्थी व 1,405 प्राध्यापकांच्या कामाचेही मूल्यांकन करण्यास मदत होऊ शकेल.

पालकांसाठी महत्त्वाचे
>महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांना व पालकांना या प्रणालीचा एक लॉग इन व पासवर्ड देण्यात येतो. त्याचा उपयोग करून पालक आपल्या पाल्यांच्या प्रगतीची माहिती घरबसल्या घेऊ शकतात. आपली मुले वर्गात हजर राहतात की नाही, त्यांनी सांगितलेल्या असाइनमेंट पूर्ण केल्या की नाही, हे पालक रोजच्या रोज तपासू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांवर पालक आणि महाविद्यालय असे दोघांचेही बारीक लक्ष राहू शकते. त्यातून त्यांच्यात गुणात्मक बदल होऊ शकतात. परिणामी ही भावी पिढी अधिक जबाबदार होईल, असे मला वाटते.
-प्राचार्य प्रतापराव बोराडे, विश्वस्त, एमजीएम

डिलिटचे ऑप्शन नाही
या प्रणालीत एकदा टाकलेली माहिती डिलिट करता येत नाही. हा बदल संस्थेच्या मागणीवरून करून घेतला आहे. यामुळे या प्रणालीची विश्वासार्हता वाढली आहे.
- स्वप्निल लोखंडे, सॉफ्टवेअर डेव्हलपर