आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article Of Shabdhsahyadri Vakrutv Prabhodhani At Paithan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीकएंड स्पेशल: बिनधास्त बोला, सभा गाजवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज शाळा, क्लासेसचे पेव फुटले आहे. बाळ जन्मल्यापासूनच्या शाळांबद्दल चर्चा व्हायला लागते. मात्र, लहान मुलांना वक्तृत्वाचे खास प्रशिक्षण ही नवीन कल्पनाच म्हणावी. साईने 13 नोव्हेंबर 2011 रोजी शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनीची स्थापना केली. पैठणगेट येथे संस्थेचे कार्यालय आहे. अवघ्या एक वर्षातच त्याने 1 हजार शालेय विद्यार्थ्यांना भाषण कला शिकवली. हे विद्यार्थी जेव्हा व्यासपीठावर उभे राहून उपस्थितांकडून टाळ्या घेतात तेव्हा त्यांच्यातील भाषण कौशल्यासह जिद्द व चिकाटी दिसून येते.

असे दिले जाते प्रशिक्षण
शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनीमध्ये कोणत्याही शालेय विद्यार्थ्याला प्रवेश घेता येतो. सिडको एन-4 मधील किलबिल शाळेत दर रविवारी सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6 अशा दोन सत्रांत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी साई महाशब्दे यांना तन्मय पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्वर नरवडे हे सहकार्य करतात. यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. यामध्ये अभिव्यक्ती, विचार, भाषा, व्यक्तिमत्त्व, आवाज, हावभाव, बॉडी लँग्वेज या गोष्टींवर भर दिला जातो.
‘वा रे वा’मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
दुरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीवरील ‘वा रे वा’ या भाषणाच्या कार्यक्रमात शब्दसह्याद्रीच्या तब्बल आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला औरंगाबादच्या विद्यार्थ्यांची भाषण कला पाहायला मिळाली. निकिता सूर्यवंशी, सिद्धा कुलकर्णी, शुभम धनवटे, युगंधरा पाटील, निकिता मंगलगे, अथर्व आहेर, तन्मय बोरे यांनी या कार्यक्रमात चमकदार कामगिरी केल्याबद्दल अवघ्या महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक झाले.
मिळवली तब्बल 500 बक्षिसे
अ‍ॅड. साई महाशब्दे याने वक्तृत्व स्पर्धेची आतापर्यंत तब्बल 500 च्यावर बक्षिसे पटकावली आहेत. त्यामध्ये पुण्यातील न्या. रानडे चषक, सुहास आनंदगावकर वक्तृत्व स्पर्धा, शब्दप्रभू पुरस्कार, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर वक्तृत्व स्पर्धेत 50 किलोचा चांदीचा चषक, देवगिरी महाविद्यालय चषक, नाशिक येथील आचार्य अत्रे करंडक इत्यादींचा त्यात समावेश आहे. त्याचबरोबर दर आठवड्याला एखाद्या ठिकाणी व्याख्यान करण्यासाठी त्यांना निमंत्रण असते.
प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी वक्तृत्व
आजचे विद्यार्थी उद्याचे सुज्ञ नागरिक आहेत. यातीलच काही विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश मिळवतील. त्या वेळी त्यांच्याकडे वक्तृत्वाची कवचकुंडले असतील तर त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी ठरेल. म्हणूनच आम्ही शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी स्थापन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. वक्तृत्व, वादविवाद, सूत्रसंचालन, मुलाखत तंत्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे. केवळ पैसे मिळवणे हाच आमचा उद्देश नाही, तर गोरगरीब मुलांना आम्ही मोफत प्रशिक्षणही देतो.
- साई महाशब्दे, संस्थापक, शब्दसह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

भीती नाहीशी झाली
साईदादांच्या मार्गदर्शनामुळे भीती गेली.हजारोंच्या समोर भाषण करण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी ही गोष्ट अविस्मरणीय आहे. त्याबद्दल लाख लाख धन्यवाद.
-अथर्व अहिरे, सहावी, महाराष्ट्र पब्लिक स्कूल

आत्मविश्वास मिळाला
मी आता आत्मविश्वासाने आपले मत सहज मांडू शकते. भावी आयुष्यात मला नेतृत्व करायचे असल्याने विचार करण्याचे बळ मला साईदादांनी दिले आहे. त्यामुळे मी सह्याद्री वाहिनीवर भाषण करू शकले.
-निकिता मंगलगे, बीएसजीएम हायस्कूल

भविष्यात फायदा होईल
सह्याद्री प्रबोधिनीत मिळालेल्या प्रक्षिणातूनच मला तसेच स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची प्रेरणा मिळाली. भविष्यात याचा फायदा होईल.
-निकिता सूर्यवंशी, आठवी, शारदा मंदिर


बिनधास्त बोलू शकतो
बोलण्याच्या बाबतीत मी फारच कच्चा होतो, परंतु आज मी हजारोंच्या गर्दीसमोर बिनधास्तपणे बोलू शकतो. सह्याद्रीवर झळकण्याची संधीही यामुळेच मिळाली.
-शुभम धनवटे, आठवी, पीएसबीए हायस्कूल


महत्त्वाच्या टिप्स
> सुरुवात प्रभावी हवी. प्रभावी वक्ता सुरुवातीच्या सेकंदांत सभा जिंकतो.
> भाषण हे तीन टप्प्यांत असते. सुरुवात, मध्य आणि शेवट.
> बोलताना र्शोत्यांची नजर चोरू नका. पायाकडे, दरवाजाकडे, एकाकडेच पाहू नये.
> शरीराच्या अनावश्यक हालचाली करू नये. टेबलवरील वस्तू हातात घेणे टाळा.
> भाषण करताना औचित्य, विवेक, तारतम्य हे शब्द स्मरणात राहू द्या.
> शब्दांना स्वभाव असतात. त्या स्वभावाप्रमाणे देहबोली, आवाजातील चढ-उतार, चेहर्‍यावरचे हावभाव उत्तम असले पाहिजेत.
>आईचे मुलावर, माळ्याचे फुलांवर, गायकाचे सुरांवर, तसे वक्त्याचे शब्दांवर प्रेम असले पाहिजे.
>भाषणावेळी डोक्याला हात लावणे, केसातून बोट फिरवणे, कानातून मळ काढणे टाळावे.
>सुरुवातीला अपयश अल्यास नाउमेद होऊ नका, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा.

उपवास करून सामाजिक कार्य
साई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या जवळपास 100 मुलांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ते एक दिवस उपवास करून पैशांची बचत करणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी 1000 रुपये जमा करणार आहे. जमा झालेला सर्व पैसा अनाथाश्रम किंवा गरजू लोकांना दान केला जाईल. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे या उपक्रमाचे नियोजन केले आहे. लवकरच हा उपक्रम राबवण्यात येईल, असे साईने सांगितले.