आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉकिंग पॉईंटः आरक्षणाचा फायदा महिला कार्यकर्त्यांना का मिळत नाही?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिकीट वाटपात आमच्यावर अन्याय झाला, असे म्हणत शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काल प्रचार कार्यालयासमोर निदर्शने केली. नेत्यांच्या नावाने खडे फोडले. काँग्रेस महिला आघाडीच्या १८ जणींनीही उमेदवारीच्या यादीत आमचा विचार झालाच नाही, असे सांगत राजीनाम्याचा इशारा दिला. त्याचे पडसाद गुरुवारी उमटले. नेत्यांच्या नावाने खडे फोडणाऱ्या शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या घरी एक महिलाच पोहोचली. तिने तिला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे, तर घराबाहेर पडत तिच्यावर बूटही फेकला. मग प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. पुढील काही दिवसांत नेतेमंडळी हस्तक्षेप करतील. आणखी दमबाजी होईल. मग महिलांच्या बंडखोरीचा विषय मागे पडेल. कारण राजकीय पक्षातील महिलांवर अन्याय हा विषय नेत्यांच्या आणि मतदारांच्या दृष्टीनेही तात्पुरताच असतो. नंतर तो करमणुकीचा, टवाळीचा, चेष्टेचा विषय होऊन जातो. ही वस्तुस्थिती आहे. नेत्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक डावलले, असे म्हणणाऱ्या महिलांनाही त्याचे गांभीर्य वाटत नाही. उलट त्याच काही दिवसांनंतर त्याच त्या नेत्यांबरोबर दिसू लागतात. पक्षाच्या बांधणीसाठी होणाऱ्या कार्यक्रमांना हिरीरीने हजेरी लावतात. पुढच्या निवडणुकीत पुन्हा तिकीट वाटपाचे दिवस आले की याच किंवा अन्य कुणी महिला असे आरोप करतात. महिला कार्यकर्त्यांनी काय आरोप केले, त्यात कितपत तथ्य होते याचा राजकीय नेते विचारही करत नाहीत. त्यामागे एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनही काही अपवाद वगळल्यास राजकारणातील महिलांना (पुरुषांच्या तुलनेत) प्रतिष्ठेचे स्थान मिळालेले नाही. एखाद्या पक्षाचे काम करणारी कार्यकर्ती म्हणजे तिला प्रसिद्धीची फार हौस आहे. नेत्यांच्या मागे मिरवण्यापलीकडे तिला काही अस्तित्व आहे, असे सर्वसामान्यांना वाटत नाही. या महिलांच्या घरची, आजूबाजूची मंडळीही कमी-अधिक फरकाने असाच विचार करत असतात. खरे तर पुरुषांप्रमाणे आपणही सामाजिक कार्य केले पाहिजे. लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. त्यांच्याकडून आपल्याविषयी आदराचीच भावना व्यक्त झाली पाहिजे, असे महिलांना ठामपणे वाटत असते. त्यामुळे त्या एकीकडे संसाराचा गाडा हाकत राजकारणात उतरतात. मात्र, त्यांचा राजकीय प्रवास पुरुषांपेक्षा बराच उशिरा सुरू होतो. बहुतांश जणी कोणतीही राजकीय परंपरा नसतानाही समाजकार्य त्यापाठोपाठ राजकारणात उतरतात. कारण त्यांना आधी घरच्यांची परवानगी घ्यावी लागते. घरची सर्व कामे झाल्यावरच बाहेर पडा, असे फर्मान ऐकून घ्यावे लागते. पुरुषांच्या बाबतीत असे होतच नाही. महिलांना त्यांना संसाराचे किमान निम्मे चक्र पूर्ण झाल्यावरच राजकारणात पाऊल ठेवता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या तरी साहेबाची मर्जी असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो. राजकारणात एक गॉडफादर पाहिजेच, अशी त्यांची प्रबळ धारणा असते. चुकून एखाद्या महिलेने स्वत:च्या बळावर अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नेतेमंडळी तिच्यावर तुटून पडतात. त्यात तिच्याच इतर महिला सहकारीही सहभागी होतात. त्यामुळे कोणतीही महिला प्रभावी वक्तृत्व, प्रश्नाच्या सखोल मांडणीतून स्वत:भोवती गट निर्माण करण्याऐवजी पक्षाचे काम करता करता साहेबांची मर्जी कशी सांभाळता येईल. कल्पक, नावीन्यपूर्ण कामे करण्याऐवजी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कशा करता येतील यावरच लक्ष केंद्रित करतात. नेत्यांना स्पर्धा वाटण्याइतपत महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटणार नाहीत, याची काळजी घेतात. आणि हे पुरुष नेते मंडळींना पक्के ठाऊक असल्याने ते त्यांचा फक्त पक्षाच्या कामापुरता, स्वत:च्या हितापुरता सर्रास वापर करतात. आणि ज्या व्यक्तीचा एवढा सहजपणे वापर करता येतो त्या व्यक्तीला सत्तेत वाटा कशासाठी द्यायचा, असा नेत्यांचा प्रश्न असतो. म्हणूनच महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असले तरी तिकीट वाटपात अशा कार्यकर्त्यांना बाजूला सारून घरच्या महिलांना पुढे केले जाते. ताकदीच्या बळावर ते रेटूनही नेले जाते. जोपर्यंत महिला महाविद्यालयीन जीवनापासून राजकीय वाटचालीची सुरुवात करत नाहीत; ठाम ध्येय ठेवून, स्वत:च्या अस्तित्वासाठी राजकारणात येत नाहीत आणि नेत्यांच्या सावलीत राहण्यापेक्षा स्वत:ची सावली मोठी करत नाहीत तोपर्यंत हेच होत राहील. केवळ जमिनीत बी टाकल्याने झाड उगवत नसते. उगवले तरी टिकत नसते. त्याला पाणी, खत, संरक्षण द्यावे लागते. सध्याच्या राजकारणात स्वत:चे झाड फुलवायचे असेल तर स्वत:लाच अत्यंत विचारपूर्वक मेहनत घ्ावी लागते. प्रत्येक पाऊल स्वत:ची ताकद वाढवणारेच असेल असा प्रवास करावा लागतो. हे कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून गॉडफादरच्या बळावर बहुतांश महिलांना पक्षातील पदे झटपट मिळतात. मात्र, कितीही बंडखोरीचे नारे दिले तरी सत्तेतील महत्त्वाचे पद केवळ पक्षाचे काम केले म्हणून मिळणे कठीण होऊन जाते.
फोटो- श्रीकांत सराफ