आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Aurangabad Municipal Corporation Elections By Deepak Patve

टॉकिंग पाॅइंट: ...तर आणि तरच करा बंडखोरीचे धाडस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यकर्त्यावर नेत्याच्या नातलगाच्या उमेदवारीमुळे खरोखरच अन्याय झाला असेल तर त्या कार्यकर्त्याने बंडखाेरी करायला हरकत नाही; पण त्यासाठी त्याच्याकडे काही क्षमता असायला हव्यात, हे आपण पाहिले. या क्षमतांपैकी पत आणि संपर्क या दोन क्षमतांवर मागच्या लेखात काही प्रमाणात प्रकाश टाकण्याचा प्रयत्नही केला आहे. आणखी काय क्षमता असायला हव्यात अशा "अन्यायग्रस्त' कार्यकर्त्याकडे स्वत:वरचा अन्याय दूर करण्यासाठी? तर प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन. बंडखोरी ही केवळ आणि केवळ आत्मविश्वासाच्या बळावरच करता येते, नव्हे आत्मविश्वास असेल तरच तसे पाऊल उचलायला हवे.
आत्मविश्वास कसला? तर जिंकण्याचा. मतदारांना आपण त्यांचा नगरसेवक म्हणून नक्की स्वीकारार्ह आहोत आणि आपल्यालाच मतदार मतदान करणार आहेत हा विश्वास. अर्थात, वास्तवाचं भानही यात अत्यंत महत्त्वाचं आहेच. असा विश्वास बाळगण्यात काही तथ्य असले पािहजे हे गृहीतच आहे. असा आत्मविश्वास नसेल तर लढण्यात बळ येत नाही.
आत्मविश्वासाअभावी नैराश्य आणि पराभवाच्या भीतीने शक्तिपात होतो. कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असेल तरच तो आपल्या सहका-यांना प्रेरित करू शकतो आणि मतदारांनाही प्रभािवत करू शकतो. अर्धी लढाई जिंकली जाते ती आत्मविश्वासाच्याच बळावर. तोच नसेल तर कोणत्याही निवडणुकीत विजय मिळणे कठीण, हे लक्षात ठेवावे. सकारात्मक दृष्टिकोनाचेही असेच महत्त्व आहे. सकारात्मकताच प्रयत्नांना बळ पुरवत राहते. मतदारांच्या सद्सद््विवेकावर विश्वास असणे, मतदार आपल्यासारख्या योग्य उमेदवाराचा नक्की विचार करतील असा विचार करणे, आपण केलेली चांगली कामे मतदारांसमोर आणणे, भविष्यातील आपल्या कामाच्या योजना मतदारांना समजावून सांगणे आणि चांगल्या कामाचे चांगलेच फळ िमळते, यावर विश्वास ठेवणे म्हणजे सकारात्मकता. तुम्ही सकारात्मक असाल तरच तुमच्याबरोबर काम करणारे तुमचे सहकारी, तुमचे कुटुंबीय सकारात्मक राहतील आणि त्यांचा उत्साह िटकून राहील. अन्यथा, त्यांना पराभवाची स्वप्ने पडायला लागतील आणि ते निराश होऊन काम करणे सोडून देतील. सकारात्मकता एवढ्यापुरतीच मर्यादित अपेक्षित नाही. विश्वासाने निवडणुकीला सामोरे जाऊन, प्रामाणिकपणे काम करून आणि शर्थ करूनही शेवटी पराभव झालाच तर निराशा येऊ देता कामा नये. आता माझे काही तरी चुकले असेल, कुठे तरी मी कमी पडलो असेन म्हणून माझा पराभव झाला. या चुका आणि उणिवा मी शोधून काढीन, आणि पुढच्या वेळी नक्की िनवडून येईन, असा विचार करण्यापर्यंत सकारात्मकता पुढे गेली पािहजे.
आमचे एक प्राध्यापक मित्र आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्याआधी त्यांनी मतदारसंघात ब-यापैकी कामे केली होती. मतदारांशी संपर्कही चांगला ठेवला होता, असे त्यांचे म्हणणे होते. तरीही मतदारांनी पराभूत केल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले. लोकांना चांगले काम करणारा माणूस नकोच असेल तर असे वाटते की नक्षलवादी व्हावे, असे ते सांगू लागले. नंतर प्रयत्नपूर्वक त्यांच्यात सकारात्मक विचार बिंबवण्यात आले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्याच मतदारसंघातून ते निवडून आले. नकारात्मकतेतून त्यांनी कदाचित राजकारणच सोडले असते तर ते आयुष्यात कधी आमदार होऊ शकले असते का? त्यामुळे सकारात्मक विचारांपासून दूर जाता कामा नये. असे असेल तरच कथित अन्याय झालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घ्यावा. जर वर सांगितलेल्या या िकमान चार क्षमता आपल्या ठायी नाहीत, असे वाटत असेल तर बंडखोरी करण्याचा विचारही मनात आणता कामा नये. ही निवडणूक आपल्याला मतदारांशी संपर्क करण्यासाठी, निवडणुकीचा अनुभव देण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, असा िवचार करून अधिकृत उमेदवारासाठी प्रचाराला लागले पािहजे. राजकारणात संधी केव्हा चालत येईल, हे कोणी सांगू शकत नाही. आतापर्यंत नगरसेवक असलेले नारायण कुचे यांच्याकडे आमदार बनण्याची संधी कशी धावत आली हे अनेकांनी जवळून पाहिले आहे. कदाचित, वेगळे काही मिळण्याची संधी आपली वाट पाहत असेलही.