आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Aurangabad Municipal Corporation Elections By Deepak Patve

टॉकिंग पाॅइंट: हे पाणी चाखणे नव्हे, गिळंकृत करणेच आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळे राखील तो पाणी चाखील, असे म्हणता म्हणता तळ्यातले बहुतांश पाणी गिळंकृत करण्याचाच प्रयत्न प्रस्थापित राजकारण्यांकडून होताना दिसू लागला आहे. महानगरपािलकेच्या निवडणुकीसाठी आपल्या मुलांना, पुतण्यांना, भावाला, बहीणीला, बायकोला आणि स्वत:लाही उमेदवारी मिळवून घेण्याचे महत् कार्य शहरातल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातल्या बड्या मंडळींनी करवून घेतले आहे. त्याचा परिणाम जो काही व्हायचा तो होणारच आहे; पण संधी दिसली की ती आपल्याला आणि आपल्यांनाच मिळाली पािहजे, असा स्वार्थी विचार करणा-यांची संख्या काही कमी नाही, हे या निमित्ताने पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. हा स्वार्थ पुढे कोणत्या पातळीपर्यंत जाईल, याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे आता खरी जबाबदारी आहे ती या शहरातल्या समजदार नागरिकांची. अर्थात, तुमची आणि आमची. आपल्या पक्षासाठी वातावरण अनुकूल आहे म्हणून मतदार कोणालाही निवडून देतील, या भ्रमात असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची. एखाद्या राजकीय नेत्याचा नातलग असणे हा गुन्हा नाही आणि केवळ राजकीय नेत्याशी नाते आहे म्हणून कोणी निवडणूक लढायला अपात्रही ठरत नाही, हे मान्य; पण अपात्र ठरत नाही याचा अर्थ पात्र ठरतोच असेही नाही. ती पात्रता सिद्ध करण्याचे आव्हान या समस्त नातलगांनी स्वीकारायला हवे. ते स्वीकारणार नसतील तर औरंगाबादकरांनी ते स्वीकारून या राजकीय नातलगांची पात्रता नीट तपासून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांची किमान पात्रता ओळखता यावी यासाठीच दिव्य मराठीने एएमसी-सीईटी अर्थात, उमेदवार पात्रता चाचणी आयोजित केली होती. त्या चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवडणूक लढवू इच्छीणा-यांनी आपली पात्रता या चाचणीतून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा राजकारण्यांच्या नव्या पिढीत आढळून आलेला सकारात्मक फरक होता; पण जुन्या पिढीचे काय? किती आणि कोणत्या राजकीय पक्षांनी पात्रता सिद्ध केलेल्या नव्या चेह-यांना उमेदवारी दिली आहे? कदाचित, अशी संख्या कमीच असेल. कारण मतदारांना गृहीत धरण्याची समस्त राजकीय नेत्यांना सवय झाली आहे. आता मात्र असे गृहीत धरणे चालणार नाही, हे या शहरातल्या मतदारांनी या प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना दाखवून दिले पािहजे. तुमच्या भावाला, बहिणीला, मुलाला, बायकोला अवश्य उमेदवारी द्या, तुम्हीही बाशिंग बांधून तयारच राहा; पण तसे करण्याआधी तुमची आणि तुमच्या या नालगांची पात्रता तुम्ही सिद्ध केली आहे का? हा प्रश्न या नेत्यांना अवश्य विचारला पािहजे. निवडणूक लढवायची होती तर त्यासाठीची सीईटी दिली होती का? दिली नसेल तर का दिली नाही? हे प्रश्न मते मागायला येणा-या उमेदवारांना औरंगाबादकरांनी विचारले पािहजेत. तसे झाले तरच नगरसेवक पद हे काही शोभेचे आणि कमाईचे पद नाही तर ते एक जबाबदारीचे पद आहे, याचे भान या मंडळींना येईल. 'यथा राजा, तथा प्रजा' अशी एक म्हण आहे. आता राजेशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीत मतदारच राजा असतो. त्यामुळे हा राजा बदलला तरच बदल घडणार आहे, हे लक्षात ठेवले पािहजे. मतदाराची मानसिकता बदलली तरच उमेदवारांची आणि उमेदवार ठरवणा-यांचीही मानसिकता बदलेल. हा बदल या िनवडणुकीपासूनच व्हायला हवा. आम्हीच योग्य उमेदवार निवडणाार नसू तर
महापािलकेचा कारभार योग्य पद्धतीने चालवला जात नाही म्हणून टीका करण्याचा अधिकार आम्हाला राहाणार नाही. त्यामुळे हीच संधी आहे भविष्य घडविण्याची. आम्ही पक्षाचा, पैशांचा, जातीचा, धर्माचा आणि अन्य कशाचाही विचार न करता केवळ आणि केवळ पात्र उमेदवारालाच निवडून देऊ, हे समस्त औरंगाबादकरांनी ठरवले पािहजे आणि तसे वागले पािहजे. मतदार तितका शहाणा झाला आहे हे या राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना यावेळी समजले तर पुढच्या निवडणुकीत अशी नागतलगांची फौज या शहराच्या गळे मारली जाणार नाही. तुम्हाला आम्ही मत का द्यायचे? समांतर पाणी योजनेबाबत तुमचे मत काय? कच-याची समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत, हे आणि दिव्य मराठीने प्रसिद्ध केलेल्या प्रश्न पत्रिकेतील काही प्रश्न मतदारांनी उमेदवारांना विचारलेच पािहजे. तसे झाले तर आणि तरच केवळ नात्याच्या भांडवलावर लोकप्रतिनिधी व्हायचे स्वप्न बाळगले जाणार नाही. अन्यथा, जसे आतापर्यंत होत आले तसेच यापुढेही घडतच राहील, यात शंका नाही.