आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On BJP Target And Congress Busy In Marathwada By Deepak Patwe, Divya Marathi

संपादकांच्या नजरेतून...भाजप लक्ष्य आणि मराठवाड्यात काँग्रेसी मस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा झंझावात नरेंद्र मोदींनी मराठवाड्यातून सुरू केला आणि त्यांच्या सलग पहिल्या दोन्ही सभा मराठवाड्यातच झाल्या. या दोन्ही सभांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद भाजप विरोधकांच्या तंबूतली चिंता वाढवणारा होता. विशेषत: मराठवाडा हा बालेकिल्ला असलेली शिवसेना या सभांनी चिंतेत पडली आहे. त्यामुळे नरेंद्रभाईंवर टीका करणार नाही, असे म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख आता त्यांना वैयक्तिक लक्ष्य करायला लागले आहेत. या दोन्ही पक्षांच्या भांडणात राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लक्ष्य होण्यापासून वाचताहेत. त्याचा परिणाम लोकसभेप्रमाणेच मराठवाड्यात काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही सहज तारली गेली, तर आश्चर्य वाटायला नको.

एकूण ४६ आमदार मराठवाड्यातून निवडून जातात. युतीच्या आपसातील छुप्या भांडणामुळे आणि कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे मागच्या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बाजी मारली होती. या वेळी मात्र युतीच्या पदरात मराठवाड्यातून भरभरून दान पडेल, असे चित्र तयार झाले होते; पण युती तुटली आणि सर्वच गणितं चुकायला लागली आहेत. आता मोदींच्या सभांमुळे या चुकलेल्या गणितांना काही सूत्र सापडतं का, याचा शोध सुरू आहे.
काँग्रेस पक्षानेही आपल्या प्रचाराची सुरुवात मराठवाड्यातून म्हणजे तुळजापूरमधून केली. त्याचा परिणाम मात्र मराठवाड्यात तितकासा दिसला नाही. पंतप्रधान मोदींची सभा अ‍ाणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा यांची तुलना होऊ शकत नाही, हे खरं; पण तरीही जो स्वच्छ ‘चेहरा’ घेऊन काँग्रेस मतदारांना सामोरे जाते आहे त्याचा अपेक्षेइतकाही गवगवा होताना दिसत नाही. उलट, काँग्रेस पक्षाची आरंभाची सभा झालेल्या तुळजापूरवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. शेवटच्या टप्प्यात इथे मोदींची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्याही सभा तिथे होत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांचं राजकीय भवितव्य काय असेल, हे कोणालाच सांगता येईनासं झालं आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपची फारशी भीती वाटत नसली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांच्याशी तगडी लढत द्यावी लागणार आहे. या मतदारसंघातली ७६ गावे उस्मानाबाद जिल्ह्यात येतात, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी निवडलेल्या मतदारसंघातच त्यांच्या पक्षाची नाव डुगडुगायला लागली आहे.

भारतीय जनता पक्षाने, किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे तयार झालेली सहानुभूतीची लाट पक्षासाठी वापरण्याचा संकल्प केलेला दिसतो आहे. त्याचा फायदा भाजपला बीड जिल्ह्यात तर नक्की होईल. जिल्ह्यातले सहाचे सहा उमेदवार निवडून आणून माझी मान उंच करा, असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे बीडमधल्या जयदत्त क्षीरसागर यांचं काय होतं, हाही कुतूहलाचा विषय बनला आहे. या सभेमुळे सर्व मुस्लिम एक होतील आणि ते क्षीरसागर यांना गठ्ठा मतदान करतील, अशीही शक्यता व्यक्त होते आहे. तसे झाले तरच क्षीरसागरांना जीवदान मिळेल. अन्यथा बीड जिल्ह्यातल्या सहाही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको. तसे झाले तर विनायक मेटेंची लॉटरी लागेल.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची इभ्रत राखणा-या काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना पहिल्यांदाच त्यांच्या हक्काच्या भोकर मतदारसंघात अडकून राहावे लागते आहे. भाजपने तिथे डॉ. माधव किन्हाळकर यांना उमेदवारी िदली आहे. पहिल्यांदाच विरोधकांनी तिथे तुल्यबळ उमेदवार दिला असल्याने अशोक चव्हाण यांना पत्नी अमिता चव्हाण यांच्यासाठी तळ ठोकावा लागला आहे. चव्हाण यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे त्यांना सहानुभूती मिळाली तरच त्यांच्या सौभाग्यवती निवडून येतील, अशी शक्यता आहे. उत्तर नांदेड मतदारसंघात डी. पी. सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सुनील कदम यांनी तगडी लढत दिली आहे. शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय शामराव कदम यांचा हा मुलगा. त्यामुळे त्यांच्या विरोधात डी. पी. सावंतांना निवडून आणण्यासाठीही अशोक चव्हाण यांना ताकद लावावी लागते आहे. शिवसेना-भाजप इथे फारसे प्रभाव टाकू शकतील, असे वाटत नाही. नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्या पोकर्णा यांना एमआयएमच्या उमेदवाराने मोठे आव्हान दिले आहे. तिथे दोन धर्मात सरळ ध्रुवीकरण होताना दिसते आहे. त्यामुळे मुस्लिम मतदानाचा टक्का वाढला तर एमआयएमला इथून आमदार मिळू शकेल अशी परिस्थिती आहे.

औरंगाबादमध्ये मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात भाजपने अतुल सावे हा सर्व अर्थाने तगडा उमेदवार दिला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या मोदींच्या सभेला लोटलेली मोठी गर्दी आणि राष्ट्रवादीने झुबेर मोतीवाला यांना उमेदवारी देऊन मुस्लिम मतांचे केलेले विभाजन, त्यात माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या माध्यमातून होणारी मुस्लिम मतांची विभागणी यामुळे दर्डांसाठी विजय तितका सोपा राहिलेला नाही.
जालना जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे हे घनसावंगी मतदारसंघातून लढत देत असून त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार विलास खरात यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. हिकमत उढाण हे शिवसेनेचे उमेदवारही तिथे आहेत. ते खरात यांची किती मते विभागतात यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र, मोदींच्या औरंगाबादच्या सभेचा परिणाम झाला, तर टोपे यांना विजयासाठी सर्वस्व पणाला लावण्याची वेळ येऊ शकते. याच जिल्ह्यात भोकरदन मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली आहे. तिथे चंद्रकांत दानवे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्या मागे थेट अजित पवार यांनीच ताकद उभी केल्याचे सांगितले जाते. जाफराबादचे रमेश गव्हाड शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहेत. ते त्यांच्या भागातील मते आकर्षित करण्यात यशस्वी झाले तर दानवे यांना मोठी अडचण होणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मतदारसंघातून सीताराम घनदाट हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. अभ्युदय बँकेचे अध्यक्ष असलेल्या घनदाट यांना रविवारी पैसे वाटपाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. नंतर त्यांचा जामीन झाला असला तरी पहिल्यांदाच घडलेली ही घटना गंगाखेडमध्ये प्रभाव टाकू शकते. तिथे गोपीनाथ मुंडे यांच्या भावाचे जावई मधुसूदन केंद्रे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. इथेही अजित पवारांनीच मोठी ताकद लावली आहे. त्याचा काय परिणाम होतो हे पाहायचे. लातूरला विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, मंत्री अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपने शैलेश लाहोटी यांना उमेदवारी दिली आहे. ते देशमुख यांना काट्याची लढत देतील असे वाटत होते; पण देशमुख विरोधक वगळले तर त्यांना इतरांवर फारसा प्रभाव अजून तरी निर्माण करता आलेला नाही. मोदींची सभा झाली तरच त्यांच्या उमेदवारीला महत्त्व येईल, असे दिसते. याच जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघात माजी मंत्री विनायक पाटील अपक्ष लढत देत आहेत. या वेळी त्यांचे पारडे जड वाटत असल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत, अशी चर्चा आहे.