आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Divya Marathi AMC CET By Deepak Patve

भाष्‍य: आशादायी चित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समस्त औरंगाबादकरांचा भविष्याबद्दलचा आशावाद अनेक पटींनी वाढावा, असे चित्र आज शहरातल्या शिवछत्रपती महाविद्यालयात पाहायला मिळाले. महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणा-या अनेकांनी तिथे येऊन स्वत:ला अजमावण्याचे धाडस केले. ‘दिव्य मराठी’तर्फे एएमसी-सीईटीचे, अर्थात औरंगाबाद महापालिका उमेदवार पात्रता चाचणीचे आयोजन या महाविद्यालयात करण्यात आले होते. कोणालाही आपली परीक्षा घेतली जाणे हे संकट वाटते आणि संकटाला कोणी आमंत्रण देत नाही, असा सर्वसाधारण अनुभव असतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणा-यांनी आधी स्वत:ची पात्रता तपासून घ्यावी, या आमच्या प्रयत्नांना किती प्रतिसाद मिळेल, याबद्दल आम्हालाच प्रश्न होता. प्रत्यक्षात इच्छुक उमेदवारांची नोंदणी थांबवून अनेक इच्छुक परीक्षार्थींना ऐनवेळी नाही सांगण्याची वेळ यावी, इतका प्रतिसाद या प्रयत्नांना मिळाला. आम्ही नगरसेवक बनू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही पात्र आहोत हे सांगण्याची संधी या चाचणीमुळे आम्हाला मिळाली, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया परीक्षार्थींनी दिल्या. हे अत्यंत सकारात्मक संकेत आहेत आणि म्हणून भविष्याबद्दलचा आशावाद वाढवणारेच ते आहेत. या चाचणीत कोणाला किती गुण मिळतील, कोण पहिला येईल आणि कोणाला कमी गुण मिळतील, हा मुद्दा वेगळा; पण अशी चाचणी आपण दिली पाहिजे असे बहुसंख्यांना वाटणे हीच मोठी बाब आहे. राजकारणाच्या आणि राजकारण्यांच्या एकूणच दर्जाचा प्रश्न अनेकांसाठी चिंताग्रस्त चर्चेचा मुद्दा बनला असताना उमेदवारांचा हा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. त्यासाठी समस्त परीक्षार्थींचे मनापासून अभिनंदन आणि आभार.
चांगले आणि वाईट सर्वच क्षेत्रांत आहे, तसे ते राजकारणातही आहे. किंबहुना, राजकारणात येऊन चांगले काही करू इच्छिणा-यांची संख्या वाढत चालली आहे, हे सध्याचे चित्र आहे. एएमसी-सीईटीला मिळालेला प्रतिसाद हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता चेंडू राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या कोर्टात आहे. या चाचणीत स्वत:ला सिद्ध करणा-यांना राजकीय पक्ष आणि नेते किती महत्त्व देतात हेही आपण पाहणार आहोत. महापालिका निवडणुकीत निवडून येण्यासाठी केवळ महापालिका कारभाराचे ज्ञान असून चालत नाही तर अनेक घटक त्यासाठी महत्त्वाचे ठरतात, हे मान्य; पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी किमान आवश्यक ज्ञान संबंधिताला असणे हे महत्त्वाचेच आहे, याचा विसर पडता कामा नये. इच्छुकांनी तर चाचणी दिली आहे, आता परीक्षा आहे ती राजकीय पक्षांची. महापालिकेत उत्तम काम करू शकतील असे कोण कोण इच्छुक आहेत, हे या निमित्ताने त्यांच्यासमोर जाणार आहे. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. अर्थात, इच्छुकांनी ही चाचणी द्यावी, असे आवाहन करून बहुतांश पक्षांच्या नेत्यांनी एक सकारात्मक पाऊल टाकलेले आहेच. ती भूमिका आणखी पुढे न्यावी आणि या महापालिकेचा पुढच्या काळातला कारभार जाणकारांच्या हाती सोपवावा, असे आवाहन आम्ही त्यांना या निमित्ताने करीत आहोत.
राजकारणी म्हणजे भ्रष्ट आणि नालायकच व्यक्ती असते, असे उच्चरवाने सांगण्यात अनेकांना फुशारकी वाटत असते. अनेक माध्यमं तर त्याबाबतीत खूपच उत्साही असलेली दिसतात. प्रत्यक्षात राजकारणीही आपण राहत असलेल्याच समाजाचे घटक आहेत, हे सोयीस्करपणे विसरले जाते आणि सरसकट सर्व राजकारण्यांना आणि लोकप्रतिनिधींना कायम आरोपीच्या पिंज-यात उभे केले जाते. असे करणे योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे. म्हणूनच ज्यांना या परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही किंवा खूपच कमी गुण मिळाले, त्याची नावे प्रसिद्ध न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, मतदारांनी आपल्याकडे मत मागायला येणा-या उमेदवारालाच थेट हा प्रश्न विचारावा, अशी अपेक्षा आहे. ज्यांनी ही चाचणी दिली नाही त्यांना ती न देण्याचे कारण तर मतदारांनी विचारावेच; पण काही प्रश्नही त्यांनी उमेदवारांना आजमावण्यासाठी विचारायला हवेत. त्यासाठी या चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आम्ही मुद्दाम प्रसिद्ध करत आहोत. या संभाव्य उमेदवारांना कोणते प्रश्न विचारण्यात आले होते याचा अंदाजदेखील त्यामुळे वाचकांना येईल. मतदारांना स्वत:लाही आजमावतायेईल. ही प्रश्नपत्रिका सोडवून "दिव्य मराठी' कार्यालयात पाठवणा-यांपैकी ज्यांना सर्वाधिक गुण िमळतील, अशा तिघांचा गौरव आम्ही करणार आहोत.
या शहरात चांगले घडत राहावे, या प्रयत्नातला ही चाचणी हा एक भाग आहे. सकारात्मक, नवा प्रघात पाडणारे समाजोपयोगी प्रयोग करणे हा ‘दिव्य मराठी’चा स्थायीभाव आहे. त्यामुळे असे उपक्रम आणि प्रयत्न यापुढेही सुरूच राहाणार आहेत. औरंगाबादकरांकडून असाच प्रतिसाद त्या प्रयत्नांनाही मिळत राहील, हा विश्वास आम्हाला आहे.