आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Vice Chancellor Dr.B.A.Chopade By Vidya Gawande, BAMU, Aurangabad

कुलगुरूंचे मिशन ‘क्वालिटी एज्युकेशन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. बी. ए. चोपडे यांनी ‘क्वालिटी एज्युकेशन’चा नारा दिला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनावर भर राहील, असा मनोदय त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला आहे. केवळ संशोधन करूनच चालणार नाही तर त्याचे पेटंट मिळवून राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय पातळीवर त्याची प्रसिद्धी होणे तेवढेच गरजेचे आहे. यामुळे विद्यापीठाची मान उंचावेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. विजय पांढरीपांडे यांच्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पुन्हा एकदा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे संशोधक म्हणून ख्याती असलेले आणि सर्वाधिक पेटंट घेण्यात यशस्वी झालेले डॉ.बाळू आनंदा चोपडे कुलगुरू म्हणून लाभले. विद्यापीठाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अकॅडमिकबरोबरच काही वैयक्तिक आठवणींनादेखील डॉ.चोपडे यांनी उजाळा दिला.

कुलगुरू म्हणाले, सध्या क्वालिटी एज्युकेशनचे मोठे आवाहन आहे. ज्या मॉडेल एज्युकेशनविषयी आपल्याकडे बोलले जाते त्या पद्धतीपेक्षाही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. कारण ज्या पद्धतीने आज मॉडेल एज्युकेशनच्या नावाखाली 35 ते 40 टक्के गुण असणा-यांना प्रवेश दिला जातो त्यात गुणवत्ता राहत नाही. शिवाय ज्या शैक्षणिक विकासाविषयी आपण बोलतो तो विकास केवळ बोलून होणार नाही. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकही तयार होणे आवश्यक आहे. त्याकरिता आपल्याला मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याबरोबरच जागतिक स्तरावर मोठे होण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशस्त अशा प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील. त्याच दिशेने माझे पुढील पाऊल असेल.

परीक्षा विभागावर विश्वासार्हता : परीक्षा विभागातील ढिसाळ नियोजनाविषयी डॉ. चोपडे म्हणाले की, जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये परीक्षा विभागाच्या सारख्याच अडचणी आहेत. निकाल वेळेत लागावेत, मनुष्यबळ कमी आहे, अशा विविध अडचणी असतील. परंतु त्यावरदेखील मात करता येईल. स्पर्धेत टिकण्यासाठी कर्मचारी व अधिका-यांनाच चांगले प्रशिक्षण देऊन परीक्षा पद्धती आणि वेळेत निकाल देणे तसेच होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील.

विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीधारकांना नोकरी नाकारली जाते का, या प्रश्नावर ते म्हणाले, सर्वच विद्यापीठे चांगली आहेत. त्यांत कोणताही भेदभाव नाही. वर्णभेद अथवा जातिभेदही नाही. काही माणसांमुळेच ही चुकीची संकल्पना पसरली आहे. या विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा आहे.

आई-वडील हीच प्रेरणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचा मान मिळाला. तसेच आज ज्या पदावर आपण आहोत याचे सर्व श्रेय आईवडिलांनाच आहे, तेच माझे प्रेरणास्थान असल्याचे डॉ. चोपडे यांनी सांगितले.

ज्ञानाच्या जोरावर मिळाले कुलगुरुपद : 70 उमेदवारांच्या रांगेतून 27 अन् त्या 27 जणांमधून पाचमध्ये येत कुलगुरुपद मिळाले. यात कोणती गोष्ट इतरांपेक्षा वेगळे ठरवून गेली, याविषयी डॉ.चोपडे यांना विचारले असता ते म्हणाले की, राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर केलेले संशोधन, त्या संशोधनाची दखल घेऊन नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधकांनी माझ्या संशोधनाचे वापरलेले रेफरन्स या सर्वच गोष्टी मला वेगळे ठरवत होत्या. त्यामुळे गुणवत्ता हीच माझी जमेची बाजू होती.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स
उच्च् शिक्षणातून ट्रॉपआऊट होणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. त्याला कारण शिक्षण पद्धतीच आहे असे नाही तर त्यास काही सामाजिक आणि आर्थिक बाजूदेखील जबाबदार आहेत. तसेच संशोधनासाठी निधी नसल्याने अडचणी येतात. त्यासाठी कमवा आणि शिका योजना मजबूत करण्याबरोबरच नव्याने येणारी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स (सीएसआर) योजना विद्यापीठात सुरू करण्याचा मानस आहे, ज्यात उद्योजकांची मदत घेण्यात येईल.

वेळप्रसंगी कठोर भूमिका
विद्यापीठाच्या विविध योजनांवर निर्णय घेताना अनेकदा राजकीय पक्ष तसेच संघटनांचा हस्तक्षेप होतो. तसेच दबावही येतो. त्यामुळे चांगले निर्णय घेता येत नाहीत, या समस्येबाबत ते म्हणाले की, एक माणूस म्हणून आदर देताना आपण जितके मोकळे वागतो तितकेच गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी विकास आणि माझी मूल्ये, तत्त्वांशी मी प्रामाणिक आहे. त्यामुळे योग्य वेळी कठोर भूमिका घ्यावी लागेल, असेही डॉ. चोपडे म्हणाले.