आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पाऊस सोमवारपासून :त्यासाठीचे विमानही औरंगाबादमध्ये दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील जनतेला प्रतीक्षा असलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग सोमवारपासून केला जाणार आहे. त्यासाठीचे विमानही औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. सी डॉपलर रडारचा प्रवास शिकागो, हाँगकाँग व्हाया मुंबई, औरंगाबाद असा होणार आहे. मंगळवारी हे रडार शहरात दाखल होणार असले तरी सोमवारपासूनच कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.
मराठवाड्यात या वर्षी दुष्काळाची स्थिती असल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा प्रयोग राबवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने तयारीदेखील करण्यात येत आहे.

सीडॉपलर रडार पोहोचणार मंगळवारी : यामोहिमेबाबत माहिती देताना दांगट यांनी सांगितले की, कृत्रिम पावसासाठीचे विमान शनिवारी दीड वाजता विमानतळावर दाखल झाले आहे. बंगळुरू येथे हे विमान मॉडीफाय करण्यात आले आहे. सी डॉपलर रडार शिकागोहून निघाले असून ते हाँगकाँगला पोहोचले आहे. सोमवारी रात्री ते मुंबईत पोहोचणार आहे. दीड टन वजनाचे हे रडार आहे. मुंबईत आल्यानंतर लगेच ते औरंगाबादकडे रवाना होणार आहे. त्यासाठी किमान बारा तासांचा अवधी लागणार असून मंगळवारी हे रडार शहरात पोहोचणार आहे. दरम्यान, विमानामध्ये छोटे रडार असते. त्यामुळे त्याच्या आधारे सोमवारपासूनच कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक सुहास दिवसे हेदेखील औरंगाबादमध्ये येणार आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीवर हे रडार बसवण्यात येणार आहे. त्यासाठी छोटे टॉवरही उभारण्यात येणार असल्याचे दांगट यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...