आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानाच्या येरझाऱ्या! पाच दिवसांनंतर विमान पुण्याहून परतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुण्यात पाऊस पाडण्यासाठी कृत्रिम पावसाचे विमान पुण्यात गेले. मात्र, पावसासाठी उपयुक्त ढग आढळले नसल्यामुळे ते परत आले आहे. विमान पुण्यात गेल्यामुळे पाच दिवसांपासून मराठवाड्यातही पावसाचा प्रयोग झाला नव्हता. अखेर पाच दिवसांनंतर विमानाची वापसी झाली असून पुन्हा एकदा कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात केली जाणार आहे.
पुणेवारी व्यर्थ : मराठवाड्यासह१४ जिल्ह्यांत चार ऑगस्टपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जात आहे. आतापर्यंत १४ दिवस विविध कारणांमुळे पावसाचा प्रयोग झाला नाही. त्यातच विमान पुण्याला गेल्याने प्रयोग बंद झाला होता. १८ तारखेला हे विमान पुण्याला गेले होते. तेथील धरण क्षेत्रात क्लाऊड सीडिंग करण्यात येणार होते. २२ सप्टेबरपर्यंत विमान पुण्यात होते. पाच दिवसांत उपयुक्त ढग कुठेच आढळले नसल्याने तेथे प्रयोग झालाच नाही.
विमान शहरात दाखल झाल्यापासून १९ दिवस कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला नाही. मध्यंतरी हे विमान बंगळुरूला दुरुस्तीसाठी गेले होते, तर काही वेळा उपयुक्त ढग नसल्यामुळे तसेच वैमानिक मुंबईला गेल्यामुळे हा प्रयोग झाला नव्हता. विमान २३ तारखेला पुण्यातून निघाले, तेव्हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर, दरेवाडी वरवंडीत क्लाऊड सीडिंग केले. मात्र, पाऊस पडला नाही.

आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी डाटा
रडारच्या माध्यमातून कोणत्या भागात ढगाळ वातावरण आहे, याच्या इमेजेस प्राप्त होतात. आपत्ती व्यवस्थापन विभागाला हा डाटा ऑनलाइन दिला जातो. तसेच एखाद्या रिसर्च सेंटरला अभ्यासासाठीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.