Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | artist in marathwada

मराठवाडा गुणवंतांची खाण

आरतीश्यामल जोशी | Update - Aug 05, 2011, 05:52 AM IST

मराठवाड्यातील कलावंतांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे.

 • artist in marathwada

  औरंगाबाद - मराठवाड्यातील कलावंतांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळेच येथील कलावंतांनी चंदेरी दुनियेत मानाचे स्थान मिळवले. येथील विभाग मागासलेला आहे ही धारणा, गैरसमज मोडून काढण्याच्या दृष्टीने आपल्या तिसऱया चित्रपटाचा शुभारंभ औरंगाबादेत करत असल्याचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश देशपांडे यांनी सांगितले.

  दहिफळे हॉस्पिटलमध्ये गुरुवारी ‘साद’ या चित्रपटाचा शुभारंभ डॉ. शशिकांत बऱहाणपूरकर यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. नाट्य व चित्रपट क्षेत्रातील यशाचा चढता आलेख मांडताना त्यांनी जीवनातील चढ-उतारांची माहिती दिली. महेश देशपांडे हे परभणी जिल्ह्यातील असून नाट्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षण त्यांनी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी व्यावसायिक नाटकाच्या ओढीने पुणे येथे धाव घेतली. ‘उंबरठा’, ‘लैला ओ लैला’ या नाटकांचे यशस्वीपणे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यानंतर मात्र पुढील काळात त्यांना काम मिळेनासे झाल्याने मन अस्वस्थ झाल्याचे देशपांडे सांगतात. काही काळ व्यवसायात मन रमविण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथे मन न रमल्याने पुन्हा नव्या उमेदीने मुंबईत नाट्यक्षेत्रामध्ये अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड सुरू केल्याचे ते म्हणाले. या काळातच अधिकारी बंधूंची ‘दामिनी’ ही मालिका फार गाजत होती. या मालिकेत सहायक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली आणि नंतर पुढच्याच वर्षी दिग्दर्शक म्हणून संधी उपलब्ध झाल्याने हाच करिअरचा टर्निंग पाइंट ठरल्याचे देशपांडे यांनी सांगितले. या मालिकेचे तब्बल एक हजार भाग यशस्वी पूर्ण केल्याचा आनंद आजही होत असल्याचे ते म्हणाले.

  ‘दामिनी’ या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीतील बहुतेक कलाकार घडले आहेत. यात अंकुश चौधरी, प्रसाद ओक, भूपेंद्र लिमये, पुष्कर चौधरी, संतोष जुवेकर यासारख्या कलावंतांनी माझ्या दिग्दर्शनाखाली काम केल्याने हा मोठा अनुभव असल्याचे देशपांडे यांना वाटते. ‘उचापती’, ‘संबंध’, ‘द ट्रक’, ‘जीवनाच्या वाटेवर’ या त्यांच्या मालिका ‘सब’ आणि ‘सह्याद्री’ वाहिनीवर झळकल्या आहेत. चित्रपटात व्यस्त असल्याने मालिका करण्यासाठी वेळ मिळत नसल्याची खंत देशपांडे व्यक्त करतात. त्यांचा ‘झुळुक’ हा श्रेयस तळपदे, ऐश्वर्या नारकर यांना घेऊन केलेला चित्रपट महानगरांत गाजला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारात या चित्रपटाला सहा नामांकने मिळाली होती. यानंतर ‘सप्तपदी’, ‘जंगली कबुतर’, कांचन अधिकारी यांचा ‘दोघात तिसरा’, ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’, ‘भक्ती गुल पॉवर फूल’ हे चित्रपट त्यांनी केले आहेत.

  आगामी चित्रपट
  नक्षलवाद्यांच्या समस्येवर भाष्य करून उपाय शोधू पाहणारा ‘निरागस’, सतीश पुळेकर आणि के. वृषाली यांची भूमिका असलेला ‘जाणिवेची रेषा’ व ‘साद’ हे महेश देशपांडे यांचे आगामी चित्रपट आहेत.

  ‘साद’ कौटुंबिक चित्रपट
  ‘साद’ या चित्रपटाचे चित्रीकरण औरंगाबाद परिसरात होणार आहे. ‘साद’ हा कौटुंबिक विनोदी चित्रपट असून प्रमुख भूमिकेत सागर तळाशीकर, भूषण कडू, नूतन जयंत, ज्योती जोशी, आसावरी तारे, प्रकाश धोत्रे हे आहेत. गीते प्रवीण दवणे व विश्वनाथ इवलेकर यांची असून विवेक आस्थाना हे संगीतकार आहेत.

  आत्मविश्वास बाळगा
  मराठवाडा ही गुणवंतांची खाण आहे; परंतु येथील कलावंतांमध्ये भाषेचा व सादरीकरणाचा न्यूनगंड आढळतो. त्यामुळे हे सर्व काही सोडून आत्मविश्वास बाळगा. मुंबईत चित्रपटसृष्टीत कुणी नसेल तर मी संधी देईन.
  महेश देशपांडे, दिग्दर्शक

Trending