आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत उपाशी कला शिक्षकांवर बरसल्या लाठय़ा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या 11 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या राज्यातील कला शिक्षकांवर शुक्रवारी (दि. 15 फेब्रुवारी) पोलिसांनी निर्दयी लाठीहल्ला केला. लोटांगण आंदोलन करत जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात ही मंडळी घुसत असताना अचानक दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने गोंधळ उडाला.

पोलिसांचा हल्ला सुरू होताच शिक्षकांनी राष्ट्रगीत सुरू केले. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पोलिसांनी लाठीमार सुरूच ठेवला. एकीकडे शिक्षक मोठय़ा आवाजात राष्ट्रगीत म्हणत होते, तर तेवढय़ाच जोमाने पोलिस लाठय़ा चालवत होते. यातून शिक्षिकाही सुटल्या नाहीत. हल्ल्यानंतर त्यांची पळापळ झाली खरी, पण बळाच्या वापरानंतरही शिक्षक जागेवरून हलले नाहीत. उदगीरचे आमदार डॉ. सुधाकर भालेराव यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनात जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोरील काच फुटली. ही काच आंदोलकांनी फोडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर रेटारेटीत ती फुटली असून कोणतीही हिंसा किंवा तोडफोडीचा आमचा उद्देश नसल्याचे राज्य कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक संघटनेने म्हटले आहे.

शिक्षणमंत्री सक्षम नाहीत : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचा आरोप याप्रकरणात मध्यस्थी करणारे भाजपचे आमदार डॉ. सुधाकर भालेराव यांनी केला. या प्रकरणात दर्डा न्याय देतील, असे वाटत नसून थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करावी लागेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर गेल्या 11 दिवसांपासून येथे उपोषणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांकडे एकाही स्थानिक पदाधिकार्‍याने लक्ष दिले नाही, यावरही त्यांनी टीका केली.

आंदोलकांच्या मागण्या : प्रत्येक शाळेत कला, क्रीडा व कार्यानुभवासाठी स्वतंत्र शिक्षक असावा. त्यांची कंत्राटी पद्धत रद्द करून त्यांना नियमित करण्यात यावे. तूर्तास अशा शिक्षकांना पाच महिन्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर सेवेत घेण्यात आले आहे. ही मुदत किमान 10 महिन्यांची करण्यात यावी. शिक्षण परिषद कायदाच तसा आहे.

केंद्र शासनाच्या निकषानुसार पाच महिन्यांसाठी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यात आम्ही बदल करू शकत नाही. विधानसभेत यावर कायदा केला तरच काही होऊ शकते.

आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. लोटांगण घालत आम्ही जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी जात होतो. अचानक पोलिस आले आणि लाठीहल्ला सुरू केला. हा प्रकार थांबावा म्हणून आम्ही राष्ट्रगीत सुरू केले. त्याचाही फायदा झाला नाही. पोलिसांनी राष्ट्रगीताचा अवमान केला.
- सतीश शिंदे, आंदोलक.

राष्ट्रगीत म्हणत असताना अचानक पोलिसांनी आमच्यावर लाठय़ा चालवल्या. हा राष्ट्रगीताचा अवमान असून पोलिसांवर कारवाई व्हायला हवी.
-उज्ज्वला कंकाळ, आंदोलक.

हा निर्णय विधानसभेतच होणार याची कल्पना असल्यामुळे मी तशी विनंती केली. आधीच अन्याय झालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करू नये, अशी विनंती मी केली आहे. या मागण्यांसाठी मी विधानसभेत लढेन.
-डॉ. सुधाकर भालेराव, आमदार.

आंदोलक थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात घुसू पाहत होते. त्यामुळे आमच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. अनिवार्य स्थितीतच हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आम्ही लाठीहल्ला थांबवला.
-अर्जुन भांड, पोलिस निरीक्षक, सिटी चौक पोलिस ठाणे.

असा आहे घटनाक्रम

15 फेब्रुवारीला लोटांगण आंदोलन करणार, असे पत्र जिल्हाधिकार्‍यांना 13 तारखेलाच देण्यात आले.

1 वाजता 400 शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य फाटकाजवळून लोटांगण आंदोलन सुरू केले. त्यात 70 महिला होत्या. 30 मिनिटांत आंदोलक कार्यालयात पोहोचले. तोपर्यंत तेथील चार पोलिसांनी सिटी चौक ठाण्याला माहिती दिली.

1 वाजून 32 मिनिटांनी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर धडक मारली. पोलिस निरीक्षक अर्जुन भांड तेथे दाखल झाले आणि दालनात घुसू पाहणार्‍या आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. दुसर्‍या मिनिटाला राष्ट्रगीत सुरू झाले. सर्व शिक्षक मोठय़ा आवाजात राष्ट्रगीत म्हणत असताना लाठीहल्ला सुरूच होता. 1 वाजून 40 मिनिटांनी आमदार डॉ. भालेराव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्यांवर शासन निर्णय घेऊ शकते, हे त्यांनी पटवून दिले आणि दोन वाजता जिल्हाधिकार्‍यांशी चर्चेनंतर आंदोलन मागे घेतले. तीन वाजता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.