आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आम आदमी’ची उमेदवारी म्हणजे मटक्याचा आकडा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिल्लीतील यशानंतर भारावून गेलेले आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत 300 उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. वर्ष-दीड वर्षातील या पक्षाचे मुख्यालय राजधानी दिल्लीत असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना जोरदार प्रसिद्धी मिळत आहे. केजरीवाल आता माध्यमांवर निशाणा साधत असले, तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील आंदोलनास मिळालेल्या प्रसिद्धीतून केजरीवाल यांना ‘अण्णा का अर्जुन’ म्हणत प्रोजेक्ट करणारा मीडियाच होता, हे ते सोईस्कररीत्या विसरले हा भाग वेगळा.

प्रसारमाध्यमांमुळे या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आणि केजरीवालही राष्ट्रीय नेते झाले. या लाटेतच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष विस्ताराची राष्ट्रीय मोहीम हाती घेतली. महाराष्ट्रासह देशातील काही उमेदवारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.‘आप’ने एवढ्या मोठ्या संख्येत उमेदवार उभे करण्यामागे यापेक्षा दुसरे कोणतेच प्रयोजन दिसत नाही.

मतदारसंघाशी काहीही संबंध नसलेले अनेक उमेदवार ‘आप’ने दिले आहेत. निवडणूक जर जुगार असेल, तर यश-अपयशाच्या शक्यतेत आपच्या उमेदवार्‍या म्हणजे मटक्याच्या आकड्याप्रमाणे वाटतात. मटक्यात आकडा लावणारे ठरावीक ‘लॉजिक’ असल्याचे सांगतात. मात्र, ते तितकेसे खरे नसते. आकडा लागल्यानंतर मात्र, तो कसा योग्य होता ते पटवून दिले जाते.

पक्षस्थापनेनंतर अल्पावधीत राज्याची सत्ता ताब्यात घेण्याची काही उदाहरणे आहेत. मात्र, एक-दोन वर्षाच्या राजकीय पक्षाने ‘होलसेल’ पद्धतीने उमेदवार उभे करण्याचे गणित मटक्याच्या आकड्यातील सूत्राप्रमाणेच आहेत. जेवढे जास्त आकडे तेवढ्या शक्यता वाढल्या.

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मुंबईत आघाडीला फायदा होईल, असे बोलले जाते. मात्र, या गोंधळात चुकून एखादा आपचा उमेदवार निवडून आल्यास आकड्याच्या समर्थनार्थ त्याअनुरूप ‘लॉजिक’ वापरले जाईल. सत्तेच्या या खेळात आपचे उमेदवार कितीही येवोत, मात्र आकडा वाढवायच्या नादात केजरीवाल यांनी व्यवस्थेला दिलेले आव्हान घातक ठरवण्याची शक्यता आहे. तीन-चार वर्षांपूर्वी ‘सच का सामना’ही मालिका प्रसारित झाली होती. सत्य सांगण्याच्या अटीवर कार्यक्रमात सहभागी व्यक्ती किती अनैतिक थराला जाते किंवा विचार करते ते दर्शकांनी पाहिले. कार्यक्रमात सहभागी नातेवाइकांना धक्कादायक गोष्टी ऐकायला मिळाल्या. सांगणाराही उद्ध्वस्त आणि तो ऐकणाराही. कार्यक्रम पाहून एका जोडप्याने ‘सच का सामना’चा प्रयोग स्वत:वर केला. अपेक्षित नसलेल्या गोष्टी एकमेकांकडून ऐकाव्या लागल्याने दोघांनीही आत्महत्या केल्याचे वृत्त त्यादरम्यान प्रसिद्ध झाले होते.

ताज्या संदर्भात केजरीवाल यांनी ‘सच का सामना’चे आयोजन केले आहे. यासाठी ते कॉँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांवर निशाणा साधत आहेत. भ्रष्टाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, दोन्ही पक्षांना लक्ष्य करत नैतिकतेच्या नावाखाली व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम केले जात आहे. कॉँग्रेसने भ्रष्टाचार केला, भाजपनेही केला असेल. मात्र, मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर केजरीवल जबाबदारीपासून का दूर गेले हा खरा मुद्दा आहे. इतरांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरून काढणे हे पती-पत्नीच्या पूर्वायुष्यातील गोष्टीवर जाहीर चर्चा करण्यासारखे आहे. यात फायदा कुणाचा? सहभागी व्यक्ती, समाज सर्वच उद्ध्वस्त. कार्यक्रमाचा निर्माता मात्र नामानिराळा. केजरीवाल सध्या याच भूमिकेत आहेत. सत्य-असत्य, नैतिक-अनैतिक, भ्रष्टाचार-सदाचाराच्या तर्कावर त्यांनी भले शेकडोच्या घरात आकडे लावले असतील. मात्र, त्यांना ‘जॅकपॉट’ लागणार की राजकीय महत्त्वाकांक्षा ‘क्लोज’ होणार, ते निवडणूक निकालात स्पष्ट होईल.