आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसामच्या हिंसाचाराचे औरंगाबादेत पडसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आसाममधील कोक्राझार येथे बोडो आणि मुस्लिम यांच्यात सुरू असलेल्या हिंसाचाराचे औरंगाबादेत तीव्र पडसाद उमटले. आसाममधील परिस्थितीवर पर्याय शोधू न शकणारे आसाम सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा, या मागणीसाठी मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. या वेळी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले पत्र पाचच्या सुमारास विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांना एका शिष्टमंडळाने दिले.

गेल्या दहा दिवसापासून कोक्राझार येथे बोडो आणि मुस्लिम समुदायात हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागत असून तेथे दंगलीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणावी तसेच आसाममधील मुस्लिमांना सुरक्षा मिळावी,अशी आशाही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या वेळी मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलचे अध्यक्ष उवैस अहमद, कर्नल नहरी, डॉ . मोहम्मद सैफोद्दीन रझवी, अब्बास रझवी, शफीक मिली, अब्दुल रहमान नदवी, मौलाना झिय्यादीन फारुकी, मोहम्मद रफतुल्ला खान, अब्दल हमीद खान, मौलाना नसीम रझवी आदींची उपस्थिती होती.

गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी : अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय रस्त्यावर जमलेल्या हजारोंच्या गर्दीमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. मुस्लिम बांधवांच्या वतीने एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्त जैस्वाल यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून पंतप्रधानांपर्यंत भावना पोहोचवण्याचे आश्वासन दिले.