पैठण - मुखी विठुनामाचा गजर, हाती टाळ-मृदंग आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन ‘भानुदास एकनाथ’ नामाचा जप करत चैतन्यमय वातावरणात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे गुरुवारी दुपारी पैठणमधून विठुरायाच्या पंढरीकडे प्रस्थान झाले.
या वेळी भक्तिरसात चिंब झालेल्या शेकडो वारक-यांनी कृतार्थ झाल्याची अनुभूती घेतली. नाथवंशजांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाथवंशज चैतन्य महाराज गोसावी, रावसाहेब महाराज, हरिपंडित गोसावी, प्रशांत गोसावी यांना 149 प्रमाणे पालखी सोहळ्यात अडथळा आणू नये यासाठी नोटिसा बजावल्या होत्या.
संत एकनाथ महाराजांच्या सहवासाची व विठुरायाच्या भेटीची आस बाळगून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, नांदेडसह राज्यभरातून हजारो वारकरी पंढरीला जाण्यासाठी नाथ महाराजांच्या वारीत सहभागी झाले होते. तर नाथ पालखीचा अभूतपूर्व सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पैठणसह अन्य ठिकाणच्या
शेकडो भाविकांसह मान्यवरांनी सकाळपासूनच पैठणमध्ये गर्दी केली होती. पालखी सोहळ्याचे मार्गदर्शक वसंत महाराज पांडव, रघुनाथबुवा पालखीवाले यांनी गागाभट्ट चौकात पालखी ठेवून घंटानाद, काकडा, अभिषेक, पंचामृत पूजा करून पालखीचे प्रस्थान केले.