आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan & Pratap Chikalikar patil In Joints Hand For Loksabha

अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर यांच्यात समेट, लातूरमध्ये काँग्रेसला फायदा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार प्रताप पाटील- चिखलीकर यांच्यात समेट झाले आहे. चिखलीकर हे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. मात्र, काही वर्षापूर्वी चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला होता. मात्र, नांदेडची उमेदवारी अशोक चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी चिखलीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच मागील काळातील वाद विसरून एकत्र काम करण्याची विनंती केली. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आहे. विलासरावानंतर मराठवाड्यात काँग्रेस विचारधारा ठेवण्याचे काम आपण सर्वांवर आहे. त्यामुळे झाले गेले विसरून काम करण्यावर एकमत झाले.
अशोक चव्हाण यांना नांदेडची उमेदवारी देतानाच लातूर आणि हिंगोली जागा निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. लातूरमधून काँग्रेसने बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपचे सुनील गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यातच विलासराव असतानाही मागील खासदार जयंत आवाळे केवळ 8-10 हजारांनी निवडून आले होते. आता विलासराव नाहीत, काँग्रेस अडचणीत आहे, मुंडेंनी जोर लावला आहे तर मोदींची हवा यामुळे भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे लातूरची जागा अडचणीत असल्याची जाणीव काँग्रेसला व त्यांच्या नेत्यांना आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांची भेट घेऊन लातूरात काम करण्याची विनंती केली. ती चिखलीकर यांनी मान्य करीत प्रचारात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चिखलीकर यांनाही लोहा नगर परिषदेत पराभवाचा धक्का बसला होता. तेथे मनसेसारख्या पक्षाने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला होता. त्यामुळे चिखलीकर यांनी भविष्यातील राजकीय सोय म्हणून तडजोड केल्याचे बोलले जात आहे. कारण यानंतर 6 महिन्यांनीच विधानसभेच्या निवडणुका आहेत. शरद पवारांनीही चिखलीकर यांना अशा भांडणात विरोधक मोठे होत असल्याचे लक्षात आणून दिले आहे.