आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashokrao Chavah News In Marathi, Businessman Meet Ashokrao

मुख्यमंत्र्यांपेक्षा अशोकराव पॉझिटिव्ह! ‘आयआयएम’साठी पाठपुराव्याचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद आयआयएम स्थापन व्हावी, या मागणीसाठी शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा चर्चेसाठी वेळ मागितला. मात्र, त्यांनी तो न दिल्याने शेवटी उद्योजकांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन ‘आयआयएम’साठी पाठपुरावा करण्याची गळ घातली. त्यांनी या मुद्दय़ावर मराठवाड्याच्या उद्योजकांची भक्कम बाजू घेत दिल्ली दरबारी नेटाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

शनिवारी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री चव्हाण शहरात आले होते. त्यामुळे ‘आयआयएम’ औरंगाबादेतच का व्हावे, हा मुद्दा पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला; पण मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना भेट नाकारली. त्यामुळे निराश झालेल्या उद्योजकांना अशोकराव चव्हाण यांच्या रूपात आशेचा किरण गवसला. अशोकराव चव्हाण यांनी उद्योजकांना त्यांच्या खडकेश्वर येथील साईशंकर बंगल्यात दुपारी बोलावले. ‘आयआयएम’ मुद्दय़ावर त्यांनी सकारात्मक भूमिका दश्रवत मराठवाड्याची बाजू दिल्लीत भक्कमपणे मांडण्याचे आश्वासन दिले. या वेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष मुनीश शर्मा, उपाध्यक्ष आशिष गर्दे, माजी अध्यक्ष मिलिंद कंक, मुकुंद कुलकर्णी, मानसिंग पवार यांची उपस्थिती होती. सर्व उद्योजकांनी ‘आयआयएम’ औरंगाबादसाठी कसे योग्य आहे हे त्यांना पटवून दिले. या मुद्दय़ावर अशोकरावांनी उद्योजकांना एक तास दिला. उद्योजकांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार राजीव सातव आणि खासदार राजकुमार धूत यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.
आयआयएमची घोषणा फसवी
विद्यार्थी आणि उद्योजकांकडून शहरात आयआयएमची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारची ही घोषणा फसवी वाटते, असे मत व्यक्त केले. देशात अशा दहा संस्था उभारण्याचा केंद्राने निर्णय घेतला असला तरी यासाठी केवळ 500 कोटी म्हणजे एका संस्थेला केवळ 50 कोटी हे फार अपुरे बजेट आहे. त्यामुळे केंद्र सरकार ही बाब किती गांभीर्याने घेते याबाबत विचार करावा लागेल. शिवाय आयआयएम जागेचा निर्णय घेण्यासाठी आयआयएमची स्वतंत्र संस्था असते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, अशी पुस्तीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी जोडली.