आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashwariya Roy , Balasaheb Thackeray And Drought Rangoli

PHOTOS : रांगोळीतून मांडली दुष्काळाची विदारकता; ऐश्वर्याचे सौंदर्य ठरले लक्षवेधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कुंचल्याच्या साहाय्याने निसर्गाच्या वैविध्यपूर्ण रंगछटा आणि व्यक्तिरेखा साकारताना आजवर अनेकदा पाहण्यात आल्या आहेत. मात्र, रांगोळीच्या माध्यमातून सिने, राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाचे पैलू तसेच दुष्काळाचे भीषण वास्तव तापडिया नाट्यमंदिरात अनेकांचे लक्ष वेधत होते.

सविता तलरेजा यांनी आयोजित केलेल्या विशेष रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (10 फेब्रुवारी) आमदार किशनचंद तनवाणी यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनातील प्रत्येक रांगोळी आपल्या मोहकतेसोबत रसिकांना अंतरंगात झाकण्यास भाग पाडणारी होती. रांगोळीच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ऐश्वर्या राय यांची रेखाटलेली व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरली. डोळ्यांचे पारणे फेडणारी रंगसंगती, एकसंघता, सहज-सुंदर चित्रण असलेल्या या रांगोळ्यांनी प्रत्येकाचे लक्ष वेधले. निसर्गाच्या रंगछटांचे सौंदर्य लीलया यामध्ये साधण्यात आले होते.

या रांगोळ्या साकारणारे वीरेंद्र मेहरा छत्तीसगडहून आले आहेत. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते वैविध्यपूर्ण रांगोळ्या काढतात. याचे प्रशिक्षणही ते देतात. कुठल्याही चित्रकाराला हेवा वाटावा अशा या रांगोळ्या काढण्याचे कौशल्य प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे आहे. पाच ते सात फुटांच्या या रांगोळ्यांमध्ये रंग अतिशय सफाईदार पद्धतीने भरण्यात आले आहेत. रांगोळ्यांचे प्रशिक्षण सिद्धेश हॉल येथे 11 फेब्रुवारीपासून देण्यात येणार आहे. मेहरा यामध्ये रांगोळीचे कौशल्य, त्यातील सौंदर्य याविषयी सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील.

(छायाचित्र : एखाद्या कॅमेर्‍याने क्लिक केल्याप्रमाणे अतिशय देखणी आणि मोहक ऐश्वर्या रांगोळीच्या कृष्णधवल रंगांनी साकारण्यात आली होती. चेहर्‍यावरील भाव इतके अचूक होते की, कृष्णधवलमध्येही तिचे सौंदर्य पाहणार्‍यांना आकर्षित करत होते.)