आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमआराम नव्हे, ‘नींद हराम’बस; थकलेल्या गाड्यांना पळवले जाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या निमआराम बस फक्त आता नावालाच उरल्या असून त्यातला आराम गायब झाला आहे. ठरवून दिलेले विशिष्ट अंतर व विशिष्ट कालावधीसाठी धावल्या की त्या बाद करायला हव्यात, परंतु तरीही त्या तशाच दामटल्या जात असल्याने बहुतांश गाड्या खटारा झाल्या आहेत. जिल्ह्यात 39 निमआराम गाड्यांपैकी 30 खराब झाल्याचे डीबी स्टारने केलेल्या तपासात आढळून आले. तरीही त्या तशाच पळवल्या जात आहेत. शिवाय त्यांचे भाडेही लालपरीपेक्षा सव्वा ते दीडपटीने जास्त आहे. त्यामुळे प्रवासी खासगी गाड्यांचा पर्याय शोधत आहेत. आगारप्रमुख म्हणतात, सर्व गाड्या बदलण्याची गरज आहे, तर सर्व गाड्या चांगल्या असल्याचा विभाग नियंत्रकांचा दावा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांमध्येच एकवाक्यता नसल्याने ही परिस्थिती केव्हा बदलेल हे सांगता येत नाही.

एसटी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लालपरी या परंपरागत बसनंतर परिवर्तन बस आणली. त्यानंतर प्रवास आणखी आरामशीर व्हावा म्हणून निमआराम बसगाड्या आणल्या. थोडी आरामशीर बैठक असलेले प्रशस्त सीट्स, जास्त मोकळी जागा यामुळेच या गाड्यांना ‘निमआराम बस’ हे नाव पडले. 1982 मध्ये एशियाड सामने झाले. त्या वेळी या बसेसची निर्मिती झाली. त्याच धर्तीवर पुढे हिरव्या रंगाच्या निमआराम गाड्या महामंडळाने टाटा, लेलँड तसेच गोवा येथील एका कंपनीकडून तयार करून घेतल्या. मुळात सुरक्षित प्रवास, त्यात या नव्या बस आल्याने खासगी बसने प्रवास करणारे प्रवासीही या निमआराम गाड्यांना पसंती देऊ लागले.

आकारले जाते जास्त भाडे
सुरुवातीला या निमआराम गाड्यांमुळे महामंडळाची कॉलर ताठ झाली, पण मंडळाने या गाड्यांची देखभाल योग्य ठेवली नाही. शिवाय वय झालेल्या गाड्या बाद करून त्या जागी नव्या गाड्या आणल्या नाहीत. निमआराम म्हटल्या जाणार्‍या बहुतांश बसेस खटारा झाल्याने प्रवासी हळूहळू तुटू लागला. रंग उडालेल्या अन जीर्ण झालेल्या या गाड्या प्रवासात काय आराम देत असतील ते त्या बसचा अवतार पाहूनच प्रवासी ठरवू शकेल इतकी भयंकर अवस्था या गाड्यांची आहे. दुसरी बाब म्हणजे या गाड्यांचे भाडेही साध्या लालपरी बसपेक्षा सव्वा ते दीडपटीने जास्त आहे. त्यामुळे लालपरीपेक्षाही खराब अवस्था झालेल्या या बसेसचे आकर्षण हळूहळू संपत आहे.

जिल्ह्यात 39 पैकी 30 गाड्या खराब
औरंगाबाद जिल्ह्यासाठी एकूण 39 निमआराम गाड्या असून त्यापैकी तब्बल 30 गाड्या खराब झाल्या आहेत. 39 पैकी फक्त 9 गाड्या चांगल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानक असो वा सिडको बसस्थानक, तेथे दिसणार्‍या निमआराम गाड्या सामान्य प्रवाशाला आजारी असल्याप्रमाणेच दिसतात. रंग उडालेल्या, गंजलेल्या या गाड्या निमआराम दर्जाच्या आहेत हे सांगावे लागते. याउलट परिवर्तन बस बर्‍या म्हणत प्रवासी त्यातून प्रवास करणे पसंत करत आहेत.

थकलेल्या गाड्यांना पळवले जाते
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 39 निमआराम गाड्या खराब झाल्यावर त्यातील फक्त 9 गाड्या बदलून देण्यात आल्या. उर्वरित 30 गाड्या 4 लाख किमी अंतरापेक्षाही जास्त अंतर धावलेल्या आहेत. तरीही त्यांना निमआराम म्हणून दामटले जात असल्याचे येथील काही अधिकार्‍यांनी खासगीत सांगितले. दुसरी बाब म्हणजे ज्या नव्या 9 निमआराम गाड्या बदलून देण्यात आल्या आहेत त्याही तब्बल 2 लाख किमी अंतर धावलेल्या आहेत.


एस. डब्ल्यू. सुपेकर, विभाग नियंत्रक

कार्यालयात उदासीन वातावरण
सर्मथनगर भागात एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांचे कार्यालय आहे. बाजूलाच एसटीचे मेंटेनन्स करणारी कार्यशाळाही आहे. दोन्ही ठिकाणी गेटपास वगैरेची सोय नाही. गेटवरील सुरक्षा यंत्रणाही कुचकामी आढळली. अगदी 50 वर्षांपूर्वीच्या या कार्यालयातील वातावरणही अजून तसेच आहे.

सर्व गाड्या बदलण्याची गरज
निमआराममधील आराम हरवला आहे.
- होय. ही प्रवाशांची तक्रार बरोबर आहे. कारण अनेक गाड्या जुन्या झाल्या तरी चालवल्या जात आहेत.
नव्या गाड्या का घेतल्या जात नाहीत?
- निमआरामचे उत्पादनच बंद आहे. लेलँड, टाटासह गोव्याची एसईएमएल या कंपन्यांकडून या गाड्या घेतल्या जायच्या. आता त्यांच्याकडूनही पुरवठा बंद झाला आहे. मुख्य म्हणजे या गाड्यांच्या चेसीसचाही तुटवडाच आहे.
जिल्ह्यातील गाड्यांची स्थिती काय आहे?
- नव्वद टक्के गाड्या थकल्या आहेत. जिल्ह्यात 39 गाड्या निमआराम प्रकारच्या चालवल्या जातात. फक्त 9 गाड्या नव्या आहेत. बाकी खूप चालवल्याने जुन्या झाल्या असून त्या बदलण्याची गरज आहे.
निमआराम व साध्या बसच्या भाड्यात किती फरक आहे?
-साध्या बसपेक्षा या निमआराम बसचे भाडे साधारण सव्वा ते दीडपट जास्त आहे.

थेट सवाल: एस. टी. सोनवणे, आगारप्रमुख

भारमानही घटले
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद जिल्ह्यात एसटीचे प्रवासी भारमानही कमी झाले आहे. मागच्या वर्षी प्रवासी भारमान 59 टक्के होते, तर यंदा 2012-13 या वर्षात ते 58 टक्के झाले आहे. निमआरामचा प्रवास खटारा झाल्याने हे भारमान कमी झाल्याचे कर्मचारी खासगीत बोलतात, तर प्रवासी भाड्यात वाढ झाल्याचा हा फटका असल्याचे अधिकारी सांगतात.

अधिकारी वर्गात मतभिन्नता
अधिकारी वर्गात या बसच्या अवस्थेबाबत भिन्न मते आहेत. एक म्हणतो बस खराब आहेत, तर दुसरा म्हणतो बस चांगल्या आहेत. एक म्हणतो बसची निर्मितीच बंद आहे, तर दुसरा म्हणतो असे काहीच नाही. सर्व काही चांगले आहे. पण डीबी स्टारने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत निमआरामची संख्या कमीच असून त्यांचा पुरवठा थांबल्याचेही खासगीत कर्मचार्‍यांनी सांगितले.

3 वर्षांनी आरामची होते लालगाडी
काळानुरूप एसटी महामंडळातील कर्मचारी व तेथील एकूणच कारभार बदललेला नाही. बसच्या वयाच्या बाबतीत बरेच नियम आता बदलले आहेत. निमआराम गाडी 3 वर्षे रस्त्यावर धावल्यावर तिचे तत्काळ लालगाडीत म्हणजे लोकल गाडीत रूपांतर केले जाते. तसेच प्रत्येक गाडी दोन महिन्यांनी मेंटेनन्सला आणली जाते. पण या सर्व नियमांना फाटा देत खराब गाड्याच निमआराम गाड्या म्हणून दामटल्या जात आहेत.

सर्वकाही चांगले आहे
निमआराम चे उत्पादनच बंद झाले आहे काय?
- मुळीच नाही. सर्वांकडून पुरवठा सुरू आहे. गोव्याची कंपनीही सुरू आहे. आमच्या कार्यशाळेत लोड वाढल्याने गोव्याच्या कंपीला काम दिले होते, पण ते बंद केलेले नाही.
निमआराम खटारा झाल्या आहेत.
- असे मुळीच नाही. सर्व गाड्या चांगल्या आहेत. कारण ज्या गाड्या खराब झाल्या होत्या त्या सगळ्या गाड्या आता बदलल्या आहेत.
नेमक्या किती गाड्या बदलल्या ते सांगता येईल का?
-दहा गाड्या बदलल्या आहेत.
साधी व निआरामच्या भाड्यात काय फरक आहे.
-फारसा फरक नाही.
सव्वा पट फरक आहे की दीड पट
-याबाबत मला लगेच सांगता येणार नाही.
विचारून सांगावे लागेल.