आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ पीडिता पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वेस्टेशनच्या गोडाऊनमध्ये २३ जूनच्या मध्यरात्रीनंतर एका मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची तक्रार तिच्या मैत्रिणीने लोहमार्ग पोलिसांकडे केली होती. घटनेनंतर ती पीडित मुलगी बेपत्ता होती. तिला शनिवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सिद्धार्थ उद्यानाच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात निलंबित झालेल्या सहायक पोलिस निरीक्षकांना तिची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला मित्रासोबत ताब्यात घेतले.
आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून पुण्याहून पळून आलेल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. ती पीडित मुलगी शहरातील रेल्वेस्थानकावरच झोपत होती. २३ जूनच्या मध्यरात्रीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना २५ जून रोजी उघडकीस आली होती. त्याच ठिकाणी १० जून रोजी तुळजापूरहून देखील एक मुलगी पालकांच्या त्रासाला कंटाळून आली होती. विशेष म्हणजे या दोघीही अल्पवयीन आहेत. २३ जून रोजी रात्री पीडित मुलगी रेल्वेस्टेशनच्या परिसरात फिरत होती. बराच वेळ झाला तरी ती परत आल्याने तिच्या मैत्रिणीने तिचा शोध घेतला असता ती रेल्वेस्टेशनच्या गोडाऊनमध्ये विचित्र अवस्थेत आढळून आल्याची फिर्याद मैत्रिणीने लोहमार्ग पोलिसांना दिली होती. यावरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तो लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.
पोलिसांना पीडित तरुणींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके नेमली होती. पुणे, जालना, दौंड आणि परभणी तसेच विविध शहरात त्यांना पाठवण्यात आले होते. हे प्रकरण निष्काळजीने हाताळल्याने लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. जी. डंबाळे आणि हवालदार व्ही. व्ही. गुरसळ यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, डंबाळे यांनी फिर्यादी मुलीकडूनच पीडितेबद्दल माहिती मिळवली. त्यानंतर ही मुलगी सिद्धार्थ उद्यानात असल्याचे कळाल्यावर डंबाळे यांनी संबंधित पोलिसांना याबाबत सांगितले पीडित मुलीला मित्रासोबत ताब्यात घेण्यात आले.
तिघेही रिमांड होममध्ये
पीडित मुलीला अत्याचाराबाबत विचारणा केली असता तिने याबाबत स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पीडित तरुणी, तिचा मित्र आणि मैत्रीण हे तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नसल्याने त्यांना रिमांड होममध्ये पाठविणार असल्याचेदेखील सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच रात्री उशिरा लोहमार्ग उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती देण्याबाबत नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...