आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर करणा-या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे करणाऱ्या नगरसेवकांना किमान १९ तारखेपर्यंत तरी जीवदान मिळणार असून शिवसेनेने निवडणुकीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत आऊटगोइंग सुरू राहाण्याची भीती असल्याने शिवसेनेने कारवाई केली नसल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून 25 वर्षांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली. त्यानंतर औरंगाबादेत मध्य मतदारसंघातील तिकिटावरून सुरू झालेल्या स्पर्धेचा फायदा घेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी थेट भाजपमध्ये उडी घेतली व तिकीटच आणले. त्यांनी पक्षांतर केल्यावर त्यांच्या समर्थकांनीही दणादण उड्या घेत पक्ष बदलला. त्यात शिवसेनेचे काही पदाधिकारी व नगरसेवकही आहेत. जगदीश सिद्ध, प्रीती तोतला व सुरेंद्र कुलकर्णी यांनी नरेंद्र मोदींच्या सभेत भाजप प्रवेश केला. पाठोपाठ दोनच दिवसांनी नगरसेविका सविता सुरे यांनीही तनवाणींसाठी शिवसेना सोडली. यापैकी कुलकर्णी हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष नगरसेवक आहेत; पण इतर तिघे शिवसेनेचे नगरसेवक असल्याने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई अपेक्षित आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने या कारवाईसंदर्भात शिवसेनेने काही निर्णय घेतलेला नाही. शहरप्रमुख राजू वैद्य म्हणाले की, पक्ष बदलणाऱ्या नगरसेवकांवर निश्चितच कारवाई केली जाणार आहे यात शंकाच नाही. निवडणूक संपली की लगेच ही कारवाई केली जाणार आहे.

आऊटगोइंग सुरूच
शिवसेनेने निवडणुकीनंतर कारवाई करणार असल्याचे म्हटले असले, तरी एवढ्या विलंबामागे वेगळेच कारण असल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे आणखीही काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून आता आणखी आऊटगोइंग होऊ नये यासाठी पक्षाला प्रयत्न करावे लागत आहेत. पण ज्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचे पद कारवाईनंतर जाणार आहे. त्यांना भाजपने मनपा निवडणुकीचे तिकीट आताच जाहीर केल्याने ते कारवाईला फारशी किंमत देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते.