आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या युवकांना मोदी लाटेची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भले भले आडवे झाले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मोदी लाट येथे थांबवता यावी म्हणून कामाला लागलेल्या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या युवकांच्या मनात मोदी लाटेची भीती असल्याचे दिसून येते. येथील राष्‍ट्रवादी भवनात तरुणांसाठी आयोजित सोशल मीडिया कार्यशाळेसाठी आलेल्या तरुणांशी संवाद साधला असता येत्या विधानसभेतही काही खरे दिसत नाही, अशा निराशाजनक प्रतिक्रिया समोर आल्या.
मोदी लाट थांबवून येथील सत्ता टिकवली जाऊ शकते, याचा आत्मविश्वास या तरुणांमध्ये दिसला नाही. सोशल मीडियातील तज्ज्ञांनी या वेळी तरुणांना मार्गदर्शन केले. सभागृहात गर्दी दिसत असली तरी तेवढीच गर्दी सभागृहाबाहेर होती. त्यांच्याशी गप्पा करताना त्यांच्या मनात ठाम आत्मविश्वास नसल्याचे दिसून आले. मोदी फॅक्टर वगैरे काही नाही, या वेळी राष्‍ट्रवादी जिंकू शकेल, असे यातील एकानेही ठामपणे सांगितले नाही, हे विशेष.
आघाडीच्या पुनर्विजयाची शक्यता वर्तवणारे दोघेच भेटले. महाराष्‍ट्र युतीकडे चेहरा नसल्यामुळे काँग्रेस आघाडीला पर्याय नसल्याचा त्यांचा दावा होता. 1995 मध्ये युतीला संधी दिली होती. मात्र त्यांनी काहीच न केल्याने 15 वर्षांपासून आघाडी सत्तेत आहे. आश्वासन पाळा किंवा ना पाळा, येथील मतदार काँग्रेसला कौल देतात, असा त्यांचा युक्तिवाद होता. तरुण तर सोडाच, पण या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या महानगरपालिकेतील एका नगरसेवकानेही या वेळी आमचे काही खरे दिसत नाही, अशी कबुली दिली. एका वेळी लोकांनी देशासाठी मोदींना मतदान केले, या वेळी ते महाराष्‍ट्र देतील, असेही मत त्याने व्यक्त केले.

काय म्हणते ही मंडळी
गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीविषयी नाराजी आहे. लोक आमचे ऐकत नाहीत. सतत घोटाळेच बाहेर येताहेत. त्यात राष्‍ट्रवादीचेही मंत्री पुढे असतात. अशा परिस्थितीत हे सरकार चांगले असे मतदारांना कसे सांगणार? लोकसभेच्या वेळी आम्ही काँग्रेस-राष्‍ट्रवादीला मतदान करणार, असे सांगणा-या मतदारांनी मोदींसाठी मतदान केले. या वेळी ते मतदान करतो म्हणतील, पण आमचे ऐकतील असे वाटत नाही.

नरेंद्र मोदींची क्रेझ आहे. त्यांनी महाराष्‍ट्र सभा घेतल्या तर सारे वारे युतीच्या बाजूने नक्कीच जाऊ शकते. गर्दी खेचणारे नेते राष्‍ट्रवादीकडे आहेत कुठे? सर्वच आश्वासने देऊन झाली आहेत, आता मतदारांना आम्ही काय आश्वासन देणार आहोत ? लोकांचा मोदींवर विश्वास आहे. ते जे म्हणतील, त्यावर मतदार विश्वास ठेवतील. त्यामुळे विधानसभेत त्यांचीच चलती असेल असे वाटते.