आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections Bet Latest News In Divya Marathi

नऊ विधानसभांसह मराठवाड्यातील लढतींवर दीडशे कोटींचा सट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आयपीएलच्या लढती असो किंवा भारत- पाकिस्तानची एकदिवसीय लढत. सट्टेबाजारासाठी प्रत्येक झुंज महत्त्वाचीच असते. विधानसभेच्या निवडणुका म्हणजे त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. पोलिसांनी कितीही जाळे आवळण्याचा प्रयत्न केला, तरी बुकी त्यातून सुरक्षित अंतरावर राहत भाव घेत राहतात. देशभरात पसरलेले डाळींचे, धान्यांचे काही विक्रेते यांच्यामार्फत जय-पराजयाचा अंदाज बांधला जातो. विशेष म्हणजे एखाद्याने कमाई केली, तर त्याला तातडीने रक्कम पोहोचती केली जाते. मात्र, वसुलीसाठी त्याला दोन-तीन दिवसांचा अवधी दिला जातो. सट्टा लावणारा आपल्यापासून कायमचा तुटू नये, याची पूर्ण काळजी बुकी घेतात, अशी माहिती या व्यवहारात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या बुकीच्या निकटवर्तीयाने दिली.
मुंबई हे बुकींचे केंद्र मानले जात असले, तरी सध्याची वस्तुस्थिती वेगळीच आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बुकींनी हैदराबाद, इंदूर येथे केंद्र तयार केले आहे. महाराष्ट्राचे भाव तेथेच घेतले जात आहेत, असे या बुकीने स्पष्ट केले. तो म्हणाला की, तीन हजार रुपयांपासून पुढील रक्कम सांगून भाव घेता येतो. निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार आघाडीवर आहे किंवा कोणाच्या विजयाची शक्यता अधिक आहे, याचा अभ्यास बुकी स्वतंत्र यंत्रणेद्वारे करतात. त्यासाठी त्यांचे एक जाळे कार्यरत आहे. डाळींचे, धान्याचे काही विक्रेते त्यात प्रमुख भूमिका बजावतात. त्यामागे कोणतेही ठोस कारण नसले, तरी हे विक्रेते बाजारपेठेत आणि सर्वप्रकारच्या वर्तुळात फिरत असल्याने विश्वासू आणि अचूक अंदाज वर्तवतात, असा बुकींचा अनुभव आहे. याशिवाय मतदारसंघातील चहा, पान टपरीवाले, गुन्हेगारी वर्तुळात ऊठबस असलेल्या व्यक्ती यांच्याकडूनही फीडबॅक घेतला जातो.

सुरक्षित व्यवहार
बुकींचा पूर्ण व्यवहार सुरक्षित मानला जातो. एखाद्याने पैसे कमावले, तर 24 तासांच्या आत त्याच्याकडे जिंकलेली रक्कम पोहोचवली जाते किंवा रक्कम नेमकी कोणत्या तारखेला मिळणार हे त्याला तातडीने कळवले जाते. पॉलिथीन बॅग, कागदी पिशव्यांतच ती पोहोचते. एखाद्याकडून रक्कम वसूल करायची असेल, तर त्याला वसुलीसाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी दिला जातो. वसुलीच्या भीतीपोटी त्याने पुढे सट्टा लावणे बंद करू नये, यासाठी ही काळजी घेतली जाते. मात्र, एकदा रक्कम देण्यासाठी तारीख आणि वेळ निश्चित सांगितल्यावर ती पाळण्याचा शब्द त्याच्याकडून घेतला जातो. त्यात हयगय झाल्यास बुकींनी नियुक्त केलेले खास लोक त्यांच्या पद्धतीने वसुली करतात. सगळाच व्यवहार काळा असल्याने अशा वसुलीबद्दल पोलिसांत तक्रारही होत नाही. शिवाय दोन मध्यस्थांमार्फतच भाव दिला घेतला जात असल्याने रक्कम वसुलीत अडचणी येत नाही, असेही बुकीच्या निकटवर्तीयाने सांगितले