आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समर्थकांना झुकते माप; कदीर मौलानांचा पत्ता कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभेचा उमेदवार ठरवताना राष्ट्रवादी काँग्रेसने पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. त्यामुळेच शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवताना त्यांनी समर्थकांना झुकते माप दिल्याचे दिसते.
मध्यमधून विनोद पाटील यांना उमेदवारी देताना कदीर मौलाना यांचा पत्ता कट करण्यात आला.
जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील उमेदवार घोषित झाल्याने आता प्रचार कामात राष्ट्रवादी वेग घेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुसऱ्या पिढीतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले असून पर्यायाने अजित पवार यांच्या संकल्पनेतील हे सर्व उमेदवार आहेत. राष्ट्रवादीत पवार यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्यांपैकी एक आमदार चव्हाण आहेत. जिल्ह्यात तीन उमेदवार आपले समर्थक असावे यासाठी फार पूर्वीपासूनच चव्हाण यांनी व्यूहरचना आखली होती. जुबेर मोतीवाला, विनोद पाटील आणि मिलिंद दाभाडे चव्हाण समर्थक आहेत.
तरुण चेहऱ्यास प्राधान्य : राष्ट्रवादीने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कदीर मौलाना यांना उमेदवारी दिली होती. मौलाना यांचा शहर प्रगती आघाडीचे उमेदवार आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आठ हजार मतांनी पराभव केला होता. मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता येथून मुस्लिम उमेदवार दिला जाईल, असे चित्र असताना राष्ट्रवादीने पाटील या तरुण चेहऱ्यास प्राधान्य दिले. पाटील यांनी मागील पाच वर्षांपासून मध्यमधून लढण्याची तयारी सुरू केली होती. खडकी या नावाने त्यांनी पानदरिबा भागात कार्यालय उघडले. विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक कामास प्रारंभ केला. नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांमध्ये एक ओळख निर्माण केली. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करून परवानगी मिळवली.
पश्चिमसाठी धावपळ : योग्य उमेदवाराच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादीला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिकन सेनेचे शांतीपुरा नंदनवन कॉलनीचे नगरसेवक मिलिंद दाभाडे हाती लागले आहेत. दाभाडे यांच्यासमवेत प्रदीर्घ सुरू असलेल्या चर्चेतून अखेर शुक्रवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या घड्याळावर लढण्यास त्यांनी होकार दिला. दाभाडे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आंबेडकरी चळवळीत मागील अनेक वर्षांपासून दाभाडे सक्रिय असून अलीकडे त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलेला आहे.

जुबेर मोतीवाला यांना संधी
पूर्वमधून नगरसेवक अभिजित देशमुख यांना उमेदवारी दिली जावी, असा मतप्रवाह होता; पण शहरात एक मुस्लिम उमेदवार देणे आवश्यक असल्याने देशमुख यांचे नाव वगळून जुबेर मोतीवाला यांना संधी देण्यात आली. मध्यमधून इच्छुक असलेले डॉ. गफ्फार कादरी यांनी पूर्वची उमेदवारी जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच एमआयएमची उमेदवारी घेतली, अन्यथा डॉ. कादरी यांचा विचार पक्षातर्फे पूर्वसाठी झाला असता. जुबेर यांचे वडील अमानुल्ला मोतीवाला 1985 मध्ये शरद पवारांच्या एस. काँग्रेसकडून त्या वेळच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून उमेदवार होते. त्यांना 41,235 तर त्यांचे विरोधी काँग्रेसचे एस. टी. प्रधान यांना 40,849 मते मिळाली होती.