आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

आश्वासने नको; वीज, रस्ते, पाणी द्या, विविध पक्षांसमोर नागरिकांनी मांडला समस्यांचा जाहीरनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निवडणुकीच्या जाहीरनाम्यात रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि सुरक्षेचा मुद्दा असतो. यावर्षीही तो आहे. मात्र मागील निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेल्या मुद्द्यांचे झाले काय ? असा प्रश्न जनतेनी विचारला आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह प्रमुख पक्षांनी आपले जाहीरनामे प्रकाशित केले. हे जाहीरनामे जनतेला किती आपलेसे वाटतात याबद्दल "दिव्य मराठी'ने केलेल्या सर्वेक्षणात हा मुद्दा समोर आला आहे. नवीन कुठले आश्वासन देण्याऐवजी केवळ वीज, रस्ते, पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी माफक अपेक्षा या वेळी नागरिकांनी व्यक्त केली.
दरवेळी निवडणुकीच्या वेळी विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतात. मात्र त्यांची किती पूर्तता होते याचा लेखाजोखा कुठलाच पक्ष मांडताना दिसत नाही. भारनियमन, रोजगार, रस्ते, शेती आणि उद्योगाच्या विकासाचे मुद्दे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आहेत. मात्र िकती पक्ष प्रामाणिकपणे त्यावर काम करतील, अशी शंका जनतेने व्यक्त केली आहे. राज्यातील शहरे शांघाय किंवा न्यूयॉर्कसारेख नको. देश स्वतंत्र झाल्यापासून रस्ते, पाणी, वीज आणि रोजगाराचे प्रश्न सोडवावेत, हीच अपेक्षा असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. यासाठी व्हीजन डाक्युमेंट, ब्ल्यू प्रिंट काहीही लागत नसून केवळ प्रामाणिक इच्छा लागते असे सर्वेक्षणात सहभागी जनतेने म्हटले.

मतदारसंघनिहाय जाहीरनामे :
मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख पक्षांनी व उमेदवारांनी स्थानिक प्रश्न, समस्या आणि विकासाच्या मुद्यावर स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. त्याचा आकर्षक पद्धतीने प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यातदेखील प्रामुख्याने, रोजगार, रस्ते, पाणी, वीज, महिला सुरक्षा, कचरा व्यवस्थापन या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

विविध पक्षांची आश्वासने
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसने जनतेला खुश करण्यासाठी पर्यटन, उद्योग, शेती, रस्ते, भारनियमन, सुरक्षा, रोजगार, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा अशा अनेक बाबी मांडल्या आहेत. मतदारांना विश्वास देण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट, ब्ल्यू प्रिंट, गुजरात मॉडेलबरोबरच महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

18 ते 35 वयोगटांतील मतदार संभ्रमित
अनेक वर्षांपासून युती, आघाडी पाहणारा तरुण वर्ग यंदा कोणाला मतदान करावे याबाबत संभ्रमित आहे. आवडत्या पक्षात दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याला उमेदवारी मिळल्यामुळे आता कोणाला मतदान करावे हा संभ्रम त्यांच्यात आहे. नवीन पर्यायही भक्कम नसल्याने त्यांची अडचण वाढली आहे.