आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औंरगाबाद शहरातील चार मतदारसंघाची उमेदवारी ठरली; आव्हान तगडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांनी पोस्टरच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ मध्ये औरंगाबाद शहर चार विधानसभा मतदारसंघांत विभागले गेले.
शहरातील मनपा हद्दीतील आठ वॉर्ड फुलंब्री मतदारसंघात गेले, तर उर्वरित शहर औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघात विभागले गेले. पूर्व मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी असून सिडको, शहर, गुंठेवारी वॉर्ड व झोपडपट्टी बहुल भागाचा यात समावेश होतो. १९९९ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा करत आहेत. विधानसभा २००९ पूर्वी औरंगाबाद पूर्व, मध्य व पश्चिम मिळून पश्चिम हा एकच मतदारसंघ होता. याचे तीन मतदारसंघांत विभाजन झाल्याने नवी समीकरणे रूढ झाली. राजेंद्र दर्डा आणि डॉ. भालचंद्र कांगो वगळता इतर पक्षांची उमेदवारी जाहीर झाली नाही. परंतु इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी जाहीर झाली तरी त्यांच्यासमोर आव्हान तगडे राहणार आहे हे निश्चित.
मतदारसंघाची स्थिती
हा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. महायुतीमध्ये भाजपला हा मतदारसंघ मिळाला. भाजपतर्फे अतुल सावे, बसवराज मंगरुळे, संजय केणेकर या मतदारसंघावर दावा सांगत आहेत. सावे यांनी ३ वर्षांपासून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी चालवली असून बजरंग चौक, सिडको व पुंडलिकनगर येथे कार्यालय थाटले व मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुमीत खांबेकर, डॉ. शिवाजी कान्हेरे, संतोष पवार व आशिष सुरडकर इच्छुकांच्या रांगेत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तसेच समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी व रिपाइंमधील आठवले गट वगळता इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी केलेली आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांना मुस्लिम तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एमआयएमने या मतदारसंघातील मुस्लिमांची संख्या लक्षात घेता तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी केली आहे. २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे जावेद कुरेशी येथून शड्डू ठोकून आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरीची भाषा केली होती; परंतु ऐनवेळी माघार घेतली.
मतविभाजनावर भवितव्य
लोकसभेत काँग्रेसचे नितीन पाटील यांना १६०० मताधिक्य होते. एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या बळावर विजयाचे गणित सुकर होईल. रिपाइं महायुतीसोबत असल्याने २५ हजार दलित मते कुणाच्या पारड्यात पडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दर्डा यांची उमेदवारी पहिल्यापासून घोषित झालेली असून त्यांच्या विरोधात डॉ. कांगो आहेत. अद्याप भाजप-शिवसेनेच्या महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजपचा उमेदवार निश्चित नाही. महायुती तुटल्यास शिवसेनाही येथून इच्छुक राहील.
मतदारसंघाची चतु:सीमा
या मतदारसंघात सिडको, शहराच्या पूर्वेकडील झोपडपट्टी व गुंठेवारीचा भाग येतो. एन-१, एन-३, एन-४ तसेच किराडपुरा, रोशन गेट, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शहा बाजार, नवाबपुरा, हनुमाननगर, पुंडलिकनगर, विजयनगर, न्यायनगर, राजाबाजार, कैलासनगर, मोंढा नाका, बायजीपुरा, इंदिरानगर हा भाग आहे. एन-८, बजरंग चौक, आविष्कार कॉलनी, मधुरानगर, अरुणोदय कॉलनी, एन-६, एन-५ ठाकरेनगर, अंबिकानगर, एस.टी. कॉलनी, जयभवानीनगर यांचा समावेश होतो.