आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंच्या तारखेसाठी शिवसेनेची धडपड; महायुतीच्या बैठकांमुळे होतेय अडचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतरचे घोडे अडलेले असताना किमान भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करून निवडणुकीच्या तोंडावर श्रेय मिळवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नात आता उद्धव ठाकरे यांच्या तारखेचा अडथळा उभा राहिला आहे. ठाकरे यांची तारीख मिळवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी जंग जंग पछाडत असले, तरी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांमुळे त्यात अडचण येत आहे. आचारसंहितेच्या आत भूमिपूजन झाले नाही, तर शिवसेनेची चांगलीच अडचण होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 20 ऑगस्टनंतर केव्हाही लागू होण्याची शक्यता आहे. त्या आधी भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्याची घाई शिवसेनेला झाली आहे. कारण लोकसभा निवडणुकीआधी समांतर जलवाहिनीचे काम मार्गी न लागल्याने शिवसेनेला त्याचा निवडणुकीत वापर करता आला नाही. शहरासाठी काय केले हे सांगण्याच्या यादीत हे महत्त्वाचे काम येऊच शकले नव्हते. तसाच प्रकार भूमिगत गटार योजनेच्या भूमिपूजनाच्या बाबतीत घडू नये, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

समांतरच्या कामाला झालेल्या विलंबाला मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता; पण आता भूमिगत गटार योजनेबाबत तसे बोलायचीही सोय राहिलेली नाही. या कामाची निविदा घारपुरे- खिल्लारे कंपनीला बहाल करण्यात आली आहे. त्यांनी सा-या औपचारिकता पूर्ण करून काम स्वीकारलेही आहे. कामाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करून शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या भात्यात हत्यार ठेवायचे आहे.
20 दिवसांपासून सुरू आहेत प्रयत्न
गेल्या 20 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची तारीख मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात ठाकरे औरंगाबादेत शिवसेनेच्या विभागीय बैठकांसाठी आले होते. त्या वेळी केवळ पक्षाच्या कामालाच वेळ देताना ठाकरे यांनी शहरातील कोणतेही कार्यक्रम स्वीकारले नाहीत. त्यामुळे आता 20 ऑगस्टच्या आत तारीख मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
त्यांच्या होकाराची आहे प्रतीक्षा
शिवसेनेचे शहरप्रमुख राजू वैद्य म्हणाले की, ठाकरे यांची तारीख मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून होकार येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. दोन दिवसांत तारीख निश्चित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महायुतीच्या बैठाकांचे सत्र
सध्या मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे. भाजपला 15 ऑगस्टपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करायची असल्याने या बैठका सतत सुरू आहेत. या काळात ठाकरे यांची तारीख मिळणे अवघड वाटत असल्याने शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हवालदिल झाले आहेत. 20 ऑगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होणार असल्याने त्या काळात हे भूमिपूजन करता येणार नाही, त्यामुळेच पदाधिका-यांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.