आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद ‘मध्य’च्या स्पर्धेत फौजिया खान यांचेही नाव, कदीर मौलाना यांचा पत्ता कट करण्‍याचा प्रयत्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. गतवेळी पराभूत झालेले कदीर मौलाना यांचा पत्ता कट करण्यात शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांना यश आल्याची चर्चा सुरू असतानाच येथून आता राज्यमंत्री फौजिया खान यांचे नाव पुढे आले आहे. ईदचे निमित्त साधून शहरभर खान यांच्या शुभेच्छांचे फलक झळकावून त्या औरंगाबादकर असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे 2009 च्या निवडणुकीत मौलाना यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेनेतून बाहेर पडून अपक्ष लढलेल्या प्रदीप जैस्वाल यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. तरीही शिवसेना उमेदवार विकास जैन यांना मागे टाकत मौलाना दुस-या क्रमांकावर होते. तेव्हापासूनच विनोद पाटील यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी चालवली होती. तर दुस-या प्रयत्नात नक्की आमदार होऊ म्हणून मौलानाही सक्रिय आहेत. पाटील यांनी कामाला लागावे, असे श्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याचेही समोर येत होते. परभणीच्या खान यांनीही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.
शहरभरात पोस्टर युद्ध
ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी वरील तिघा मंडळींमध्ये अक्षरश: पोस्टर युद्ध सुरू आहे. तिघांचेही पोस्टर मध्य मतदारसंघात झळकताना दिसत असून मौलाना यांनी त्यांच्या मुलाचाही फोटो पोस्टरवर घेऊन पुढचीही पिढी राजकारणात असेल, असे संकेत दिले आहेत. पाटील यांनी आषाढी एकादशीनिमित्त शहरभर दोनशेवर पोस्टर लावले होते. त्याच जागेवर ईदच्या शुभेच्छा झळकताहेत. गतवर्षीच्या ईदला असे चित्र दिसले नव्हते, हे विशेष.

विचार होऊ शकतो
सर्व इच्छुकांसोबत माझेही नाव चर्चेत आहे. माझा औरंगाबाद किंवा परभणी मतदारसंघासाठी विचार होऊ शकतो. किंवा कुठेच संधी नाही, अशीही स्थिती येऊ शकते. पुढील घडामोडींवर सर्वकाही अवलंबून आहे.
प्रा. फौजिया खान