आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा रणधुमाळी आजपासून होणार सुरू, शहरातील इच्‍छुक उमेदवार आज करणार अर्ज दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील प्रमुख पक्षाच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे गुरुवारपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल व आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.
शिवसेनेच्या तिकिटावर एकदा अपयश, दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून यश मिळाल्यानंतर प्रदीप जैस्वाल मध्य मतदारसंघातून, तर पश्चिममधून विद्यमान आमदार संजय शिरसाट दुपारी उमेदवारी अर्ज भरतील. शिवसेनेची यादी अद्याप जाहीर झाली नसली, तरी अर्ज भरण्यासाठीचा अवघे तीनच दिवस शिल्लक राहिल्याने सेनेच्या नियोजित उमेदवारांनी अर्ज भरण्याचे निश्चित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरण्यास पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यामुळेच ही मंडळी धारिष्ट दाखवत आहे. काँग्रसेने उमेदवारी दिली नसल्याने समाजसेवक शिवनाथ राठी व एमआयएमकडून इम्तियाज जलील हेदेखील मध्यमधून अर्ज भरतील. पश्चिममधून पँथर्स रिपब्लिकन पार्टी व एमआयएमतर्फे गंगाधर गाडे अर्ज दाखल करतील. पूर्वमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो अर्ज भरणार आहेत. सकाळी दहा वाजता कामगार चौक एन-३ येथून मिरवणुकीद्वारे ते शासकीय तंत्रनिकेतन, देवगिरी महाविद्यालयाजवळ येथील निवडणूक कार्यालयात जातील. मिरवणुकीत प्रख्यात अभिनेत्री व कांगो यांची कन्या मयूरी कांगो, पूजा पवारही सहभागी होणार असल्याचे बुद्धप्रिय कबीर यांनी कळवले आहे.
राष्ट्रवादीकडून कोण?
दरम्यान, आघाडीचेही निश्चित नसल्याने मध्यमधून राष्ट्रवादीकडून कोण, याचे उत्तर मिळू शकलेले नाही. उद्या त्यांच्याकडून कोण अर्ज भरेल हे सांगण्यात आलेले नाही. गतवेळी पराभूत झालेले कदीर मौलानाच या वेळी उमेदवार असतील, अशी चर्चा आहे तर शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनीही जोरदार तयारी चालवली आहे.
ओवेसी यांची आज सभा
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता गंगाधर गाडे व 12 वाजता इम्तियाज जलील उमेदवारी अर्ज भरतील. तर सायं. 7 वाजता आमखास मैदान येथे सभा होईल. दरम्यान, वर्दळीचे ठिकाण असल्याने ओवेसी यांच्या रोशनगेट येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली.