आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंडखोरी टाळण्यासाठी थेट दिल्लीश्वर मैदानात, काँग्रेस बंडखोरांची यादी रात्रीपर्यंत दिल्लीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- युतीबरोबरच आघाडीही फिसकटली असली तरी काँग्रेसच्या पराभवाला विरोधकांपेक्षा बंडखोरच जास्त कारणीभूत ठरतील, याची जाणीव असल्याने संभाव्य बंडखोरी शमवण्यासाठी थेट काँग्रेसच्या श्रेष्ठींनी हस्तक्षेप करण्याचे ठरवले आहे. राज्यातील संभाव्य बंडखोरांची यादी, त्यांच्या मोबाइल क्रमांकासह रात्री उशिरापर्यंत दिल्लीत पोहोचती होणार आहे. त्यांच्याशी थेट दिल्लीहून बोलणी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मंगळवार आणि बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. त्यामुळे रात्री दिल्लीश्वरांच्या हाती यादी पडल्यानंतर संभाव्य बंडखोरांशी बोलणी सुरू होईल. सध्या अपक्ष अर्ज भरून बंडाच्या तयारीत असलेल्या उमेदवारांना काय आश्वासन दिले जाईल, हे गुलदस्त्यात असले तरी स्वबळावर लढत असताना बंडखोरी टाळण्यात यश आले तर काँग्रेस राज्यातील मोठा पक्ष होऊ शकेल, यावर श्रेष्ठींना विश्वास असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे संभाव्य बंडखोरांशी अर्थपूर्ण बोलणी होणार हे स्पष्ट झाले आहे.
थेट वरून बोलणी होण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील नेते त्यांच्याशी खासगीत बोलतील. या स्तरावर बंड शमत असेल तर ते शमवावे, अन्यथा दिल्लीतून मोठे नेते यात सहभागी होतील. त्यामुळे किमान 90 टक्क्यांपर्यंत बंडखोरी शमेल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे. दाखल झालेल्या अर्जांत काँग्रेसचे किती जण आहेत, त्याचे कारण काय, उमेदवारी न मिळाल्याने कोणी अर्ज केला, यापूर्वी त्यांना काही आश्वासन देण्यात आले होते काय, या सर्व बाबींचा विचार करून संभाव्य बंडखोरांशी बोलणी करावी, ते स्थानिकांचे ऐकत असेल तर त्यांचे काय म्हणणे आहे, हे वरिष्ठांना लगेच कळवावे, ते ऐकणार नसतील तर मोबाइल क्रमांकासह त्यांच्या नावाची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याने दिल्लीत पोहोचती करावी, असे सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया म्हणाले, निवडणुकीच्या दरम्यान ही एक प्रक्रिया आहे. काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य बंडखोरांची नावे तसेच त्यांच्या मोबाइल क्रमांकासह यादी थेट दिल्लीत मागवण्यात आली आहे. त्यानुसार आम्ही ती देत आहोत. रात्री उशिरापर्यंत सर्वच संभाव्य बंडखोरांची यादी दिल्लीत पोहोचलेली असेल. ते पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांना आम्ही तूर्तास बंडखोर म्हणणार नाही. एक ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आमच्यासाठी ते अपक्ष आहेत आणि ते माघार घेतील, असा आमचा विश्वास आहे. मोठ्या पक्षात किरकोळ वादविवाद-मतभेद असतात. त्यांचा राग कमी झाला की ते आमच्याच उमेदवाराचा प्रचार करतील, असा दावाही त्यांनी केला.
कोणाशी होणार बोलणी?
एका विधानसभा मतदारसंघात किमान 10 हजारांवर मते घेण्याची क्षमता असलेल्यांशी गांभीर्याने बोलणी होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. त्यापेक्षा कमी मते घेणाऱ्यांशीही पक्ष बोलणी करणार असून पक्ष सत्तेत आल्यास त्यात सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते. मात्र, दोन हजारांपेक्षा जास्त मते घेण्याची धमक नाही, तरीही पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्यांना मात्र भाव दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.