आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य, पश्चिम 18; पूर्वत 29 उमेदवार, 65 जणांनी रिंगणातून हलवले बस्तान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद पूर्व, मध्य, पश्चिम आणि फुलंब्री मतदारसंघातील 65 जणांनी आज अखेरच्या दिवशी आपले उमेदवारीचे बस्तान गुंडाळले.
नगरसेवकपद, पक्षात मानाचे स्थान, फ्लॅट व जमिनीत भागीदारीची आमिषे तसेच दबावतंत्राचा त्यासाठी जोरदार वापर झाला. काही जणांनी अर्थपूर्ण चर्चेनंतर पूर्ण समाधान झाल्याची खात्री पटल्यानेही अर्ज परत घेतले. त्यामुळे पूर्वमध्ये 29 तर मध्य आणि पश्चिम मतदारसंघात 18 तर फुलंब्रीत 13 उमेदवार राहिले आहेत.

पूर्वमधून शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांच्यासह 20 जणांनी माघार घेतली. आता येथे भाजपचे अतुल सावे, शिवसेनेच्या कला ओझा, काँग्रेसचे राजेंद्र दर्डा, राष्ट्रवादीचे जुबेर अमानुल्ला मोतीवाला, मनसेचे सुमीत खांबेकर, भाकपचे डॉ. भालचंद्र कांगो, बसपचे कचरू सोनवणे, एमआयएमचे डॉ. अब्दुल गफार कादरी, अपक्ष उत्तमसिंह पवार आदी 29 जण रिंगणात आहेत.
पश्चिम मतदारसंघ
राष्ट्रवादीचे विनोद बनकर, दलित पँथरचे संजय जगताप यांच्यासह 11 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे आता मैदानात 18 उमेदवार उरले आहेत. येथे शिवसेनेचे संजय शिरसाट, भाजपचे मधुकर सावंत, काँग्रेसचे डॉ. जितेंद्र देहाडे, राष्ट्रवादीचे मिलिंद दाभाडे , मनसेचे गौतम आमराव, एमआयएमचे गंगाधर गाडे, अपक्ष जालिंदर शेंडगे यांच्यासह 18 उमेदवार राहिले आहेत.

औरंगाबाद मध्य
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या चार तासांत 26 जणांनी माघारीचा रस्ता धरला. त्यामुळे येथेही 18 उमेदवार राहिले. येथे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, भाजपचे किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे एम. एम. शेख, राष्ट्रवादीचे विनोद पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि मनसेचे राजगौरव वानखेडे, समाजवादी पक्षाचे अफसर खान रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून बस्तान हलवणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने माजी महापौर रशीदमामू, मनमोहनसिंग ओबेराय, माजी नगरसेवक पूनमचंद बमणे, शिवनाथ राठी, माजी उपमहापौर किशोर थोरात, कुंजबिहारी अग्रवाल आदींचा समावेश आहे.