आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळामुळे टळली बंडखोरीची पीडा, वैजापुरात बहुरंगी लढत होण्याची चिन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- विधानसभा निवडणूक रणधुमाळीत सत्तासंघर्षाच्या टोकदार भूमिकेतून शिवसेना-भाजप युती आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस या प्रमुख पक्षांनी एकमेकांची साथ सोडून स्वबळावर निवडणूक जिंकण्याची भूमिका घेतल्यामुळे मतदारसंघात कोणाची किती शक्ती आहे याचा उलगडा 19 ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत कायम होणारी बंडखोरीची पीडा स्वबळावर निवडणूक लढवण्यामुळे टळली आहे.
शिवसेना-भाजप, कॉँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, बसपा या प्रमुख पक्षांतील उमेदवारांबरोबरच पाच अपक्ष असे एकूण 13 उमेदवार निवडणूक आखाड्यातील शिलेदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना-भाजप युतीतील मित्रपक्ष भाजप 25 वर्षांच्या फाटाफुटीनंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात सत्तेची कोरी करकरीत पाटी घेऊन नरेंद्र मोदींच्या लाटेवर विधानसभा गाठण्याच्या तयारीने उतरला आहे. दुसऱ्या बाजूने बंडखोरीची भूमिका बजावणारे भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांना यंदा राष्ट्रवादीकडून दिलासा मिळाला. गेल्या वेळी कॉँग्रेसकडून 39 हजार मते घेणाऱ्या डॉ. दिनेश परदेशींना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. विजयाची हॅट्रट्रिक पूर्ण करून शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी आता चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. मनसेने कल्याण दांगोडेही मैदानात उतरवले आहेत.
सगळेच कामाला
रामहरी जाधव यांनी शेकापचा झेंडा हातात घेऊन चिकटगावकरांना विजयाबरोबरच नाकी नऊ आणण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळाच्या हिमतीवर, तर उमेदवार आपली विकासकामे, संपर्क व नात्यागोत्याच्या भरवशावर यश मिळवण्याच्या भूमिकेने उतरले आहेत. डोंगरथडी भागातून भाऊसाहेब चिकटगावकर, रामहरी जाधव, एकनाथ जाधव तसेच बाबासाहेब पगारे असे चार उमेदवार आमने-सामने आहेत.