आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळचे शिवसैनिक आता प्रतिस्पर्धी, कन्नड तालुक्यातील विधानसभा उमेदवरांची परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- कन्नड तालुक्यात एकेकाळी शिवसैनिक म्हणून एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. तेही वेगवेगळ्या पक्षांकडून. त्यामुळे प्रचारात शिवसेनेचा मुद्दा अधिक चर्चेत आहे. शिवसेनेचे उमेदवार, प्रचारक पक्षाची ध्येयधोरणे राज्यासाठी कशी उपयुक्त आहेत, शिवसेनेचे समाजकारण कसे लोकांसाठी उपयुक्त आहे, हे सांगत आहेत. तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक शिवसेनेत चांगल्या कार्यकर्त्याचे कसे हाल होतात, नेतेमंडळी कसा त्रास देतात, लोकांच्या हिताची वाट लावण्यात शिवसेना कशी अग्रेसर आहे, हे सांगत आहे.

सहकारमहर्षी म्हणून ओळख असलेले बाळासाहेब पवार यांच्या नावाने कन्नड तालुका ओळखला जात होता. पवारांनी औरंगाबाद जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला. सोबत शरद पवार यांच्या विरोधात सातत्याने ठाम भूमिका घेतली. त्यांच्या पश्चात कन्नडच्या राजकारणात मोठा नेता निर्माण झाला नाही. काही अंशी रायभान जाधव यांनी त्यांची जागा भरून काढली. परंतु शिवसेनेचा उदय झाल्यापासून येथे एका पक्षाचे वर्चस्व राहिले नाही. जाधव यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या वाटेवर जाता जाता ते शिवसेनेकडून लढत असल्याची चर्चा होत आहे. त्यासोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकेकाळचे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात आहेत.
हर्षवर्धन गेल्या वेळी मनसेकडून आमदार झाले. वेरूळ येथे पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नामदेव पवार आहेत. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा मोठा काळ शिवसेनेत गेला. खासदार चंद्रकांत खैरे यांना कंटाळून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेचे उमेदवार सुभाष पाटील यांना तर औरंगाबादेत शिवसेना उभी करण्याचे प्रमुख शिलेदार म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्यामुळेच 1986- 88 कालावधीत ग्रामीण भागात शिवसेना झपाट्याने पसरली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून त्यांचे नेत्यांशी खटके उडाले. बरीच वर्षे अज्ञातवासात गेल्यावर त्यांनी मनसेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूतही दहा वर्षे शिवसेनेत होते. त्या वेळी नामदेव पवार यांच्याशी उडालेल्या संघर्षामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इशाऱ्यावरून रिंगणात उडी घेतली. थोडक्या मतांनी त्यांचा विजय हुकला. या साऱ्या माजी शिवसैनिकांमुळे मतदारांमध्ये संभ्रम आहे.
भाजप, राष्ट्रवादीचेही तेच
भाजपचे उमेदवार डॉ. संजय गव्हाणे यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती, तर मारुती राठोड हे रा.स.प.चे उमेदवार असून तेही अगोदर राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. एकूणच डॉ. संजय गव्हाणे व मारुती राठोड हेदेखील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच होते. कन्नड मतदारसंघात मागील वेळीदेखील सर्वच पक्षांच्या अंतर्गत बंडाळीमुळेच हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघात विजय कोणाचा, याचा अंदाज बांधणे अवघड आहे.