आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिककडून राष्ट्रीय पक्षाकडे, नगरसेविका सविता सुरे व मनसेचे पदाधिकारी भाजपमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभेच्या रणधुमाळीत प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष अशी जोरदार लढाई सुरू आहे. प्रादेशिक पक्षांची नेतेमंडळी राष्ट्रीय पक्षांवर जोरदार हल्ले चढवत आहेत, तर दुसरीकडे औरंगाबादेत प्रादेशिक पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षात प्रवेश करत असल्याचा नवा ट्रेंड पाहण्यास मिळत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सविता सुरे व मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून हा ट्रेंड अधिक स्पष्ट झाला.

बारा दिवसांपूर्वी शिवसेना-भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोडली. सर्वच पक्षांनी स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेवर टीका करणार नाही, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले, तर काँग्रेसवर घणाघात करणार नाही, असे राष्ट्रवादीने जाहीर केले. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना-भाजप, तर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका सुरू केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरताच हे चित्र बदलले. प्रादेशिक विरुद्ध राष्ट्रीय पक्ष अशी आरोपांची राळ उडू लागली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेने भाजपविरुद्ध आक्रमक आघाडी उघडली. राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेत्यांवर टीका सुरू झाली.

तीन उदाहरणे
1 औरंगाबादेत मात्र प्रादेशिक पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रीय पक्षाकडे वळत असल्याचे दिसले. त्याचे उदाहरण ४ ऑक्टोबरला झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेत पाहण्यास िमळाले. शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, प्रीती तोतला, जगदीश सिद्ध, माजी सभागृहनेते अविनाश कुमावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खैरेंच्या एकतर्फी कारभाराला कंटाळल्याचे त्यांचे म्हणणे होते.
2 एक तपापासून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे कदीर मौलाना, सुरजितसिंग खुंगर, नवाब पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी म्हणजे मराठा समाजाचा स्वयंसेवक संघ असल्याची टीका करून ते बाहेर पडले.
3 शिवसेना नगरसेविका सविता सुरे, मनसेचे शहर उपप्रमुख राजेंद्र कपाळे, शिवसेनेचे विभाग उपप्रमुख राजकुमार गायकवाड, माजी शाखाप्रमुख भगवान जुंबड आदींनी सोमवारी भाजपत प्रवेश केला.