आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळेच प्रचारात; कामाला मजूरही मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-विधानसभा निवडणुकांमुळे अनेक बेरोजगारांना सध्या रोजगार मिळाला आहे. प्रचारासाठी महिलांनाही दोन ते तीन तासांसाठी 300 ते 500 रुपये मिळत असल्याने काही दिवसांसाठी का होईना त्यांची अडचण दूर झाली आहे. विशेष म्हणजे घरकाम तसेच बांधकामाच्या ठिकाणी मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत असून निवडणूक म्हणजे आमच्यासाठी सुगीचे दिवस अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहेत. अनेकजण पदयात्रा आणि रॅली काढून मतदारांना आवाहन करत आहेत. रॅलीत जास्तीत जास्त लोक घेऊन उमेदवाराच्या पाठीशी जनसामान्यांची मोठी शक्ती असल्याचे भासवले जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघाचा विचार करता एका मतदारसंघात 16 पेक्षा अधिक उमेदवार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मोठी रॅली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या नाहीत. त्यामुळे अधिकाधिक महिलांना पदयात्रा, रॅलीत सामील करून घेण्यासाठी त्यांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. याबाबत काही महिलांना विचारले असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे स्पष्ट केले. प्रचार करत दिवसभर फिरण्यासाठी दिवसाकाठी 500 रुपये मिळत आहेत. 8 ते 10 तास मातीकाम करून 500 रुपयेही मिळत नाहीत. येथे दोन ते चार तास सोबत फिरण्याचे पाचशे रुपये मिळत असल्याने महिला रॅलींमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
आस्थेवाईक चौकशी
एरवी आमदार आमच्याकडे कधीच लक्ष देत नाहीत. आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो असता, कार्यालयाच्या बाहेरूनच कार्यकर्ते हुसकावतात. सध्या मात्र काळजीने आम्हाला रॅलीत सहभागी होण्याचे पैसे मिळाले किंवा नाही हे विचारतात. हेच दिवस आमच्यासाठी सुगीचे दिवस आहेत. नंतर आम्हाला कुणीच विचारत नाही.