आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या प्रचारासाठी पश्चिम, मध्यचे पदाधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तिकीट मिळवून देण्यापासून औरंगाबाद पूर्वची निवडणूक खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिष्ठेची केली असून महापौर कला ओझा यांच्या प्रचारासाठी शहराच्या इतर भागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी जुंपले जात आहे. याचा परिणाम औरंगाबाद पश्चिम व मध्यमधील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारावर होत असल्याची तक्रार त्‍या मतदारसंघांतील पदाधिका-यांनी केली आहे. युती तुटल्यावर शिवसेना औरंगाबाद पूर्व मतदारसंघात कुणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागून राहिले होते. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघातील तिकिटासाठी प्रतिष्ठा पणाला लावत सगळ्या इच्छुकांची नाराजी ओढवून घेत महापौर कला ओझा यांनाच तिकीट मिळवून दिले. सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांनी तर उमेदवारी अर्ज भरूनही टाकला व थेट बंडाचा झेंडाही फडकावला होता; पण त्यांना कसेबसे शांत करण्यात आले.
दुसरीकडे महापौर कला ओझा यांच्या प्रचाराची सूत्रेही खासदार खैरे यांनी हातात घेतली असून महापौरांसाठी त्यांनी पश्चिम आणि मध्यमधील शिवसेना व पक्षाच्या अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारकामाला जुंपले आहे. बडे पदाधिकारी हलवण्यात आले नसले, तरी इतरांना पूर्वमध्ये लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खैरे यांचे विश्वासू नंदकुमार घोडेले यांनाही पूर्वकडे लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे.

हेही नाराज, तेही नाराज
"दिव्य मराठी'ने याबाबत नाराज पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आॅन रेकॉर्ड बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, खासगीत त्यांनी पाठवलेल्या या पदाधिकाऱ्यांमुळे पूर्वमधील शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. आमच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. त्या बाहेरच्यांना दिल्याने आमच्यावर विश्वास नसल्याची भावना बळावली आहे. दुसरीकडे पश्चिम आणि मध्यमधील कामाला लागलेल्या पदाधिकाऱ्यांना अचानक पूर्वमध्ये पाठवण्यात आल्याने इकडचे नियोजन कोलमडले आहे.या कार्यकर्त्यांना गृहीत धरून प्रचारफेऱ्या, घरोघरी जात मतदारांच्या भेटी आदींचे नियोजन करण्यात आले होते; पण आता त्यात अडचणी येत आहेत. परिणामी, महापौरांसाठी इतर उमेदवारांची अडचण केल्यासारखेच चित्र पाहायला मिळत आहे.