आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंना चेकमेट; दाशरथे सेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर लढण्यासाठी उतरलेल्या शिवसेनेतील राजकारण मात्र सुरूच आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना गंगापुरात तिकीट देताच निकाल लागण्याआधीच त्यांच्याकडील पद काढण्यात आले असून त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून सुहास दाशरथे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे गंगापुरातून इच्छुक आणि तिकीट नाकारल्याने नाराज झालेले माजी आमदार यांना सहसंपर्कप्रमुख पद देण्यात आले आहे. यामुळे आता पुन्हा नव्याने नाराजीचे सूर सुरू झाले आहेत.
शिवसेनेत खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात सुरू असलेली धुसफूस वेळोवेळी चव्हाट्यावर येत असते, पण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यात अधिकच तीव्रता आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे आणि खैरे यांच्यातील लव्ह अँड हेट संबंध आधीपासून होतेच. त्यामुळे त्यांनी गंगापूरचे विधानसभा तिकीट मागताच त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न खासदार खैरे यांनी केले. दानवे निवडणुकीत गुंतल्याचे पाहताच आपले निकटवर्ती नंदकुमार घोडेले यांना प्रभारी जिल्हाप्रमुख करून टाकले. त्यामुळे नाराजी आणखीच वाढली. राजू वैद्य हे या पदासाठी इच्छुक होते, ते नाराज झाले. दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्यात आणि घोडेले यांच्यात विस्तव जात नाही. त्यामुळे उपजिल्हाप्रमुख घोडेले यांचे प्रमोशन केलेले पाहताच तेही नाराज झाले. तिकडे औरंगाबाद पूर्वमधून उमेदवारी मिळवण्यासाठी ताकद लावणाऱ्या सुहास दाशरथे यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या व खैरेंनी महापौर कला ओझा यांच्यासाठी तिकीट मागवून घेतले. कन्नडमधून तिकीट मागणारे अण्णासाहेब मानेही नाराज झाले.
दाशरथे, मानेंचे पुनर्वसन : या राजकीय नाट्याचा पुढचा अंक काल पार पडला. सुहास दाशरथे यांना प्रभारी जिल्हाप्रमुख करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर त्यांची नियुक्ती पूर्णवेळ करण्यात येईल. किशनचंद तनवाणी यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या सहसंपर्कप्रमुखपदावर अण्णासाहेब माने यांना बसवून त्यांची नाराजी कमी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्या म्हणजे अंबादास दानवे यांचे पंख छाटण्याचाच प्रकार आहे. अंबादास दानवे विजयी झाले तर पद बदलले असते तर ते सयुक्तिक ठरले असते. पण वेगळा निकाल लागल्यास पदही गेले आणि हाती काहीच नाही अशी अवस्था होऊ शकते, असे शिवसेनेतील नेतेमंडळी म्हणत आहेत. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मागील काही वर्षांत जिल्ह्यात उभ्या केलेल्या संघटनेच्या बळावरच आज एकट्याने निवडणुका लढवताना शिवसेनेला यंत्रणेची कमतरता भासत नाही. जिल्ह्यात चारही पक्षांत शिवसेनेचेच संघटन सर्वात मजबूत आहे, असे शिवसेनेतील मंडळीच सांगतात.

तात्पुरती समजूत काढली
ऐन निवडणुकीत ही नाराजी सुरू झाल्याने खासदार खैरे यांच्यावरील दबाव वाढला. त्यामुळे त्यांनी थोडी माघार घेत घोडेले यांची नियुक्ती केली नसल्याचे सांगत त्यांना समन्वयाचे काम देण्यात आल्याचे स्पष्ट केले, तर वैद्य, दाशरथे व त्रिवेदी यांची समजूत काढली.
आता घोडेले नाराज
दरम्यान, जिल्हाप्रमुखपदाच्या शर्यतीत असलेल्या नंदकुमार घोडेले यांना अचानक मध्येच ठेंगा दाखवण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. या संदर्भात "दिव्य मराठी'ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.