आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन आमदार अल्पशिक्षित, उमेदवार मात्र उच्चशिक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील चारपैकी दोन मतदारसंघांतील विद्यमान आमदारांचे शिक्षण जेमतेम असल्याचे त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रांच्या माध्यमातून दिसून येते. पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांनी नागपूर आणि लंडन येथे शिक्षण घेतले असून फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी होमिओपॅथीचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा आणि दर्डांचा अपवाद वगळता 'पश्चिम'चे संजय शिरसाट आणि ह्यमध्यह्णचे प्रदीप जैस्वाल यांनी केवळ दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने चारही आमदारांना टक्कर देणाऱ्या 82 उमेदवारांची शैक्षणिक अर्हता तपासली असता बहुतांश जणांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्याचे स्पष्ट झाले.
राज्याचा कारभार हाकण्यासाठी फारसे शिक्षण नसले तरी चालते हे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कार्यावरून लक्षात येईल.
देहाडे सर्वांत शिक्षित उमेदवार
शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री अशा चार विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची शैक्षणिक अर्हता तपासली असता सर्वाधिक शिक्षण घेणारे उमेदवार म्हणून डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. (वनस्पतिशास्त्रात) केले आहे. शिवाय त्याच विषयात पीएच.डी. करून त्यांनी संशोधक उमेदवार होण्याचा मान मिळवला. पश्चिममध्ये एकूण 18 उमेदवार असून भारिप-बहुजन महासंघाकडून लढणारे दीपक राऊत हे इंजिनिअर आहेत. राष्ट्रवादीचे मिलिंद दाभाडे यांचे शिक्षण बारावी, एमआयएमचे उमेदवार गंगाधर गाडे यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मनसेचे गौतम आमराव यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याशिवाय बहुतांश अपक्ष पदवीधर आहेत.

पूर्वमध्ये शिक्षित उमेदवार
भाजपचे अतुल सावे यांनी बीकॉम केले आहे. मनसेचे सुमीत खांबेकर यांनी एम. ए. केले आहे. राष्ट्रवादीचे जुबेर मोतीवाला यांनी एल.एल.एम आणि एमबीए केले आहे. पूर्वमधील बहुतांश उमेदवार सुशिक्षित असून अपक्षांचीही शैक्षणिक अर्हता चांगली आहे.
'मध्य'तील उमेदवार उच्चशिक्षित
आमदार प्रदीप जैस्वाल यांचे शिक्षण दहावीच्या आतच आहे. इम्तियाज जलील यांनी जनसंवाद व वृत्तपत्रविद्याचे शिक्षण घेतले आहे. विनोद पाटील यांनी बीकॉमचे शिक्षण घेतले आहे. किशनचंद तनवाणी यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एम. एम. शेख यांनी उच्चशिक्षण घेतले आहे.

उच्चशिक्षणात वैविध्य
पूर्वचे आमदार आणि काँग्रेस उमेदवार दर्डा यांनी नागपूर येथून पदवी संपादन केली, तर मुंबईच्या शासकीय मुद्रण संस्थेतून त्यांनी तीन वर्षांचा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शिवाय लंडनमध्येही त्यांनी दोनवर्षीय ग्राफिक्स डिझाइनचे प्रशिक्षण घेतले. फुलंब्रीचे आमदार, काँग्रेस उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचे होमिओपॅथीचे शिक्षण झाले आहे. त्यांच्या स्पर्धेतील राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांनी नांदेड येथून एम. ए. इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे. हरिभाऊ बागडे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पूर्वमधील काँग्रेस बंडखोर उत्तमसिंह पवार यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याचे त्यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.