औरंगाबाद - सोमवारी सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शक्तिप्रदर्शन करण्याठी शेवटचा दिवस मिळाल्याने तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी पायी, दुचाकी रॅली काढून मतदानाचे आवाहन केले. पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिनाभरापूर्वी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सभा, रॅली, पदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अनेक कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले. मंगळवारी मात्र गुप्त बैठका, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर उमेदवार भर देतील.
पूर्व : मतदानाचे आवाहन
भाजपचे अतुल सावे यांनी चिश्तिया चौक ते बजरंग चौक या रस्त्यावर कार्यकर्त्यांसह रॅली काढली. बजरंग चौकातच मनसेचे उमेदवार सुमीत खांबेकर यांनी पायी रॅली काढली, तर एमआयएमचे उमेदवार डॉ. गफार कादरी यांनी बायजीपुरा, सेंट्रल नाका परिसरात शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेच्या उमेदवार महापौर कला ओझा यांनी दुचाकी रॅलीद्वारे मतदारसंघ पिंजून काढला. राजेंद्र दर्डा यांनी कार्यकर्त्यांसह शहाबाजार, आझाद चौक या भागात दुचाकी रॅली काढली. अपक्ष उमेदवार उत्तमसिंह पवार, कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद्र कानगो, राष्ट्रवादीचे जुबेर मोतीवाला यांनीही रॅली काढून मतदानाचे आवाहन केले.
मध्य : रस्ते जाम
शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी क्रांती चौक, पैठण गेट, किराडपुरामार्गे टीव्ही सेंटर, हर्सूल भागात रॅली काढली. भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी टीव्ही सेंटर चौक आणि सिडको-हडकोच्या परिसरात रॅली काढली. रॅलीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामुळे टीव्ही सेंटर चौकातील रस्ते जाम झाले होते. त्याचबरोबर काँग्रेसचे एम.एम. शेख, मनसेचे राजगौरव वानखेडे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनीही रॅली काढली. राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांच्या वतीने बळीराम पाटील हायस्कूल परिसर आणि कटकट गेट परिसरात दुपारी रॅली काढण्यात आली.
पश्चिम : मतदारांच्या भेटी
शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी रॅली काढली होती. ज्योतीनगरातून निघालेली ही रॅली उल्कानगरी, श्रीकृष्णनगर, जवाहरनगर, क्रांती चौक, उस्मानपुरा, भाजीवाली बाई चौक, शासकीय तंत्रनिकेतन मार्गे पदमपुऱ्यातील प्रचार कार्यालयात पोहोचली. मधुकर सावंत यांनीही आज शेवटच्या दिवशी मतदारांना गाठण्यासाठी पदयात्रा व भेटीगाठीचा वापर केला. काँग्रेसचे जितेंद्र देहाडे यांच्या प्रचारासाठी आज पदयात्रा व बैठकांचा आधार घेतला. पदमपुरा, बन्सीलालनगर, वेदांतनगर, रेल्वेस्टेशन भागात पदयात्रा काढण्यात आल्या. त्यानंतर देवळाई परिसर व विविध भागांत कॉर्नर बैठका झाल्या.