आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या धुरळ्यात शहराचे प्रश्न दुर्लक्षित, राजकीय पक्षांचे एकमेकांवर शरसंधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मागील बारा दिवस उडालेला प्रचाराचा धुरळा बसल्यानंतर सर्वसामान्य मतदारांच्या प्रश्नांवर काहीही ठोस मिळाले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिन्ही मतदारसंघांत तेथील समस्यांबाबत ना कुणी ऊहापोह केला ना नवे काही करण्याची तयारी दर्शवली. प्रतिस्पर्धी पक्षांना दूषणे देत आम्ही कसे चांगले आहोत हे सांगण्यातच सर्वांचा प्रचार संपला.
15 ऑक्‍टोंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणदुंदुभी आज शांत झाल्या. मागील बारा दिवसांपासून शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, मनसे, बसपा व काही ताकदवान अपक्ष असा सर्वांनीच प्रचाराचा जोरदार धुरळा उडवला होता. 27 सप्टेंबरपर्यंत राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होते. पण युती आणि आघाडीचे गाडे रुळावरून घसरले आणि उमेदवारांसह मतदारांतही प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. हे संभ्रमाचे वातावरण शेवटच्या दिवसापर्यंत कायमच राहिले. सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपापली ताकद जोखण्याच्या व दाखवण्याच्या तयारीत असल्याने प्रचारही एकमेकांना कमी लेखण्यातच संपला. राजकीय पक्षांची गणिते बिघडल्याने हे आरोप-प्रत्यारोपांचे सत्र शेवटपर्यंत सुरू राहिले. त्यात औरंगाबाद शहराच्या प्रश्नांवर कोणी काहीच बोलले नाही.

कोणी कसा केला प्रचार
काँग्रेस : आघाडी तुटल्याने राष्ट्रवादीवर हल्लाबोल करीत काँग्रेसने 15 वर्षांत केलेल्या कामांची माहिती मांडण्यात बराच वेळ गेला. याशिवाय भाजपने पंतप्रधानांच्या मदतीने चढवलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यातच बराच वेळ गेला.
राष्ट्रवादी : काँग्रेसने कशी कामे केली नाहीत हे सांगण्यावर अधिक भर राहिला. याशिवाय भाजपला लक्ष्य करून त्यांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ गेला. काँग्रेससोबत केलेल्या कामांची माहिती सांगितली.
शिवसेना : युती तुटण्याला भाजपच जबाबदार आहे व आपली भूमिका कशी योग्य आहे यातच शिवसेनेचा सारा प्रचार फिरत राहिला. काँग्रेस व राष्ट्रवादीवर तिखट हल्ला चढवण्याऐवजी पहिले टार्गेट भाजपच राहिले. याशिवाय पारंपरिक हिंदुत्ववादी भूमिका प्रचारात मांडण्यात आली.
मनसे : शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी यांच्यावर टीका करण्यात प्रचार संपला. राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटचा प्रचारात थोडाफार वापर करण्यात आला. बाकी एकमेकांवर टीका करण्यातच प्रचाराचा कालावधी संपला.
एमआयएम : मुस्लिम मतदारांची संख्या डोळ्यांसमोर ठेवून मुस्लिमांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने कसे काही केले नाही हे सांगतानाच पारंपरिक शत्रू असणाऱ्या शिवसेना व भाजपवर शरसंधान केले.