औरंगाबाद - पाच बसेसला शालेय बस म्हणून परवानगी तसेच सात नवीन बसेसला विद्यार्थी वाहतूक परवाना देण्यासाठी आणि आठ स्कूल बसच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी सात हजारांची लाच मागणाऱ्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह एका दलालास लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. सुधीर दिनकरराव जायभाये (४२, रा. प्लॉट. नं. ३९, महाराणा प्रताप हाउसिंग सोसायटी एन-७, सिडको) आणि उपेंद्र ऊर्फ बाबू जयप्रकाश रॉय (३३, रा. गरमपाणी) अशी लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार हे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसचा शाळांना पुरवठा करतात. त्यांच्याकडे पाच नवीन बसेस असून त्या बसेसना स्कूल बसचा परवाना नाही. या पाचही बसेस स्कूल बस म्हणून सामावून घेण्यासाठी तसेच सात बसेसना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी देण्यासाठी आणि एका बसचा परवाना नूतनीकरण आणि दुय्यम परवाना प्रत मिळण्यासाठी त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज केला होता. १८ जानेवारी रोजी त्यांनी सदरील दस्तऐवज घेऊन ते सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांना भेटले. जायभाये यांनी सदरील कामासाठी ११ हजार ३५० रुपयांची शासकीय फी भरण्यास सांगितले. फी भरल्यानंतर जायभाये यांनी पुढील कामासाठी तक्रारदारास १० हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम उपेंद्र ऊर्फ बाबू या दलालाकडे देण्यास सांगितले. १९ जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता साक्षीदारांसमक्ष जायभाये यांनी हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि लाचेची रक्कम बाबूकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले होते.
यांनी केली कारवाई : हीकारवाई एसीबीचे उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक अनिता वराडे, कर्मचारी श्रीराम नांदुरे, कैलास कामठे, विजय ब्राह्मंदे, हरिभाऊ कुऱ्हे, अजय आवले, बाळासाहेब महाजन, सुनील फेपाळे, सचिन शिंदे, मीरा सांगळे, चालक दिलीप राजपूत, शेख मतीन आदींनी केली.
आठ वर्षांनंतर आरटीओत ट्रॅप
तब्बल आठ वर्षांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालयात कारवाई केली आहे. २००८ मध्ये मोटार वाहन निरीक्षक वाघ यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या वेळी ज्या तक्रारदाराने तक्रार केली होती त्याचाच या तक्रारीत समावेश असल्याची चर्चा आरटीओ कार्यालयात होती. आरटीओ कार्यालयात सध्या ४०० एजंट असून त्यांच्याशिवाय या कार्यालयात पानही हालत नाही. या एजंटांचा अधिकाऱ्यांच्या दालनासह कार्यालयभर वावर असतो. त्यांच्यात आणि अधिकाऱ्यांमध्ये काही बिनसले की आंदोलने, अशा प्रकारचे ट्रॅप होतात, असा अनुभव आहे.
असा लावला सापळा
गुरुवार,२१ जानेवारीस लाचलुचपत विभागाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास सापळा लावला. या वेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये एजंट उपेंद्र रॉय यांनी पंच, साक्षीदारासमक्ष लाचेची मागणी करून हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जायभाये रॉयविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांच्याही घराची झडती घेणे सुरू असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.